मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भावनिक आवाहन केले आहे. यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, मराठी संदर्भात, मराठी महिलांसंदर्भात, एकूणच सर्वच महिलांबाबत कुणावरही अन्याय होणार नाही. न्याय आणि सत्य या दोन पायांवर हे सरकार मजबुतीने उभे आहे असे राऊत म्हणाले.
कुणावरही अन्याय होणार नाही
या राज्यात कोणावर अन्याय होणार नाही. हे तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवरायांच्या विचाराने चालणारे सरकार आहे. महिलेवर अन्याय होणार नाही म्हणजे नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे. रेडकर या भाजप नेत्यांना भेटल्या आहेत. प्रत्येक ठिकाणाचा मसुदा मुख्यमंत्र्यांकडे आला आहे. सकाळीच मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणं झालं. सर्वच महिलांबाबत कुणावरही अन्याय होणार नाही. न्याय आणि सत्य या दोन पायांवर हे सरकार मजबुतीने उभे आहे असे राऊत म्हणाले.
सहकारावरून टीका
महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही देशासाठी आदर्श आहे. फक्त एखादी संस्था आणि संघटना आमच्या पक्षाच्या ताब्यात नाहीत, म्हणून त्या मोडणं किंवा त्यांच्यामागे चौकशी लावणं. याला सहकार म्हणत नाही, याला सूड सहकार म्हणतात असे राऊत म्हणाले.