मुंबई - भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूचे वार करत हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबईतील धारडी भागात घडली. सतीश कल्लू भारद्वाज (वय 24) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर हा खून झाला आहे. दरम्यान, यातील सर्व संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.
कांदिवली शताब्दी रुग्णालयात केले होते दाखल
यातील गोविंद पारखे (वय 35) या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी खुनाच्या प्रयत्नात शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगून तो नुकताच तुरूंगातून बाहेर आला होता. गोविंद आणि मृत सतीश हे दोघेही दहिसर पूर्व, धारखडी येथील रहिवासी आहेत. दहिसर पूर्व धारखडी भागात रात्री सव्वा आठच्या सुमारास सतीश आणि गोविंद दोघांची अचानक भेट झाली. त्यावेळी सतीशचा मित्रही घटनास्थळी पोहोचला. दरम्यान, गोविंदने सतीशच्या मित्राला मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी सतीशने मध्यस्ती केली. दरम्यान, गोविंदने सतीशच्या पाठीवर चाकूचे वार केले. त्यानंतर गंभीर जखमी झाल्याने सतीशला त्याच्या मित्रांनी कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळानंतरच सतीशचा मृत्यू झाला.
पोलिसांनी गोविंद पारखे आणि इतर 5 जणांना अटक केली
घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. गुन्हा नोंदवून पोलिसांनी तत्काळ यातील संशयीतांना अटक केली आहे. सतीश दहिसर येथे एका खासगी कंपनीत स्वयंपाक्याची नोकरी करायचा. पोलिसांनी गोविंद पारखे आणि इतर 5 जणांना अटक केली आहे.