मुंबई - गोरेगाव आरे येथील मेट्रोच्या कारशेडसाठी 2 हजार 700 झाडे तोडण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला. त्याला सत्ताधारी शिवसेनेकडून विरोध केला जात असतानाच पालिका प्रशासनाकडून झाडे तोडण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. तसेच या झाडे तोडण्याच्या बदल्यात 13 हजार 110 झाडे 30 दिवसात लावण्याचे आदेश पालिकेने मेट्रो रेल्वेला दिले आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना कोणती भूमिका घेते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. त्यासाठी आरेमधील 5 एकर जागेमधील 2700 झाडे तोडली जाणार आहेत. त्यात 2180 झाडे तोडण्यास तर 460 झाडाचे पुनर्रोपण करण्यास नुकतीच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. आरेमधील झाडे तोडायला पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला आहे.
आमचा विरोध मेट्रोला नसून आरेमधील झाडे तोडण्याला आहे असे शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आरे वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. काही संघटना झाडे तोडण्याच्या विरोधात न्यायालयात गेल्या आहेत. असे असताना पालिकेने मेट्रो रेल कॉर्पोरेशनला एक पत्र लिहिले आहे. पालिकेने मेट्रो रेल्वेला लिहिलेल्या पत्राद्वारे 2700 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. तसेच 30 दिवसात याच विभागात नव्याने 13 हजार 110 झाडे लावण्यास सांगितले आहे. यामुळे आता पालिकेतील सत्ताधारी शिवसेना कोणती भूमिका घेते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.