मुंबई - मुंबईमधील ट्रॅाफिक सुरळीत व्हावे म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाच रस्ते शुक्रवारपासून पार्किंग मुक्त केले आहेत. या रस्त्यांवर पार्किंग केल्यास पालिकेने दंड वसूल करण्याचा इशारा दिला होता. आज या रस्त्यांवर पार्किंग केलेल्या २८ वाहनांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करत ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत, गतिमान व शिस्तबद्ध व्हावी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हावी या उद्देशाने बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच उपाययोजनांचा भाग म्हणून येत्या ३० ऑगस्ट २०१९ पासून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या पाच रस्त्यांचा काही भाग प्रायोगिक तत्वावर 'पार्किंग मुक्त' करण्यात आला आहे. या रस्त्यांवर पालिकेने पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिकेने निवृत्त सैनिकांचीही मदत घेतली आहे. या कारवाईदरम्यान पालिकेने ६ दुचाकी, २ तीनचाकी आणि २० चारचाकीवर अशा एकूण २८ वाहनांवर कारवाई करताना ६५ हजार रुपयांची दंड वसुली केली आहे.
या पाच रस्त्यांवर पालिकेने केले आहे नो पार्किंग -
दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्गावरील चर्चगेट स्टेशन ते ऑपेरा हाऊस, दादर येथील गोखले मार्गावरील पोर्तुगिज चर्च ते एल. जे. जंक्शन, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पतरु ते निर्मल लाईफस्टाईल, पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गावर जुहू एअरपोर्ट ते ओशीवरा नदी, न्यू लिंक रोडवर डी. एन. नगर मेट्रो स्टेशन ते ओशीवरा नदी या ठिकाणी पार्किंग करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. या ठिकाणी पार्किंग केल्यास दंड वसूल करण्याबरोबरच पुन्हा वाहन उभे केल्यास वाहनावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.