मुंबई - मुंबईतील ३ लाख ४८ हजार ६७२ मालमत्तांपैकी तब्बल ७६ हजार ४२५ मालमत्तांमधील मैलापाणी ( sewage water ) पर्जन्यवाहिन्यांमध्ये, नद्या- नाल्यांमध्ये सोडले जाते. मुंबईतील जल वाहिन्यांमध्ये जाणारे हे मैले पाणी रोखण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने ( Mumbai Muncipal Corporation ) घेतला आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेकडून सल्लागार नियुक्त केला जाणार आहे.
२० ठिकाणचा मैला खाड्यांमध्ये -
मुंबईतील मैलापाणी प्रक्रिया न करता थेट नदी-नाले, समुद्र अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडले जाते. हरित लवादाने याबाबत पालिकेला दंड ठोठावत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पालिकेकडून मागील चार वर्षापासून याबाबत अभ्यास, उपाययोना करण्याच्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मालमत्तांमधून ३५ हजार ४४२ पर्जन्यवाहिन्यांमध्ये मैलापाणी सोडले जात असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे. ४० हजार ७५६ मालमत्तांमधून मैला नाल्यांमध्ये सोडला जात आहे. शिवाय २०७ ठिकाणचा मैला थेट समुद्रात तर २० ठिकाणचा मैला खाड्यांमध्ये सोडला जातो.
सल्लागाराची नियुक्ती -
नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडण्यात येणार्या या सांडपाण्याचा सर्वाधिक फटका मिठी नदीलाही बसला आहे. याकडे लक्ष वेधून पालिकेने याबाबत उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. पालिका पहिल्या टप्प्यात सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागाराच्या सुचनांनुसार प्रकल्पाचा आराखडा तयार केला जाणार आहे. या आराखड्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिकेने सल्लागारासाठी निविदा मागवल्या असल्याचे सांगण्यात आले.
असे होणार काम -
- मैलापाणी नदी नाल्यांमध्ये सोडल्या जाणार्या ठिकाणाची माहिती एकत्र करणार
- सांडपाणी नैसर्गिक स्रोतांच्या ठिकाणांचा अभ्यास करणार
- मैला पाणी प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करणार
- प्रकल्प राबविण्यासाठी निविदा प्रक्रियांचा मसुदा तयार करणार शिवाय अंमलबजावणीसाठी उपाय सुचविणार
हेही वाचा - Fire In Delhi : दिल्लीत झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू