मुंबई - रुग्णालयात दाखल असलेल्या किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची प्रकृती अधिक गतीने सुधारण्यासाठी रुग्ण व डॉक्टर यांच्यातील नाते अधिक घट्ट होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले.
सेंट गो. सू. वैद्यकीय महाविद्यालय व रा. ए. स्मा. रुग्णालयाचा ९५वा वर्धापन दिन समारंभ आज केईएम रुग्णालयाच्या जीवराज मेहता सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे आदी जण उपस्थित होते.
'यशस्वी लढाई'
अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, की गत ९४ वर्षाच्या इतिहासाची उजळणी करताना ज्यावेळी केईएम रुग्णालय सुरू झाले त्यावेळी १२५ बेडचे असलेले केईएम रुग्णालय हे आता १८०० बेडवर पोहोचले असून बाह्यरुग्ण विभागाची क्षमता ही साडेतीन हजाराहून १८ लाखांवर पोहोचली आहे. सद्यस्थितीत उद्भवणारे आजार तसेच साथीचे आजार यांची वारंवारिता लक्षात घेता आपत्कालीन स्थितीत आरोग्य विभाग तयार राहण्याच्या दृष्टिकोनातून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी सांगितले. त्यासोबतच भविष्यातील आरोग्याच्या या स्थितीत आपल्याला फारसा तयारी व नियोजनाला वेळ मिळणार नसून तात्काळ प्रतिसाद देणे आपल्याला आवश्यक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळातसुद्धा आपण उपचार पद्धती निश्चित करून कोरोना नियंत्रणासाठी सर्व टप्प्यांवर यशस्वी लढाई दिली. त्यामुळेच आज आपण लसीकरणाच्या टप्प्यांवर येऊन पोहोचलो असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी सांगितले.
'रोडमॅप तयार करा'
यापुढील काळात आरोग्य क्षेत्रात प्रगती करीत असताना रुग्ण व डॉक्टर यामध्ये गैरसमज राहू नये, यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच डॉक्टर व रुग्ण यांचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी तसेच रुग्ण आजारातून लवकर बरा होण्यासाठी डॉक्टरांनी स्वतःहून रुग्णाला भ्रमणध्वनी करून त्याच्या तब्येतीची ख्यालीखुशाली विचारली तर रुग्णांसोबत भावनिक जवळीकता वाढवून हा रुग्ण अधिक झपाट्याने बरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकारचा प्रयोग आपण वांद्रे येथील जम्बो कोविड समर्पित रूग्णालयात केल्याचे त्यांनी सांगितले. केईएमच्या वटवृक्षाचा भविष्य काळामध्ये आणखी विकास व्हावा या दृष्टिकोनातून कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी अधिक संशोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व प्रकारची संसाधने पुरविण्यासाठी तयार असून कार्यरत असलेल्या डॉक्टरांपैकी एखाद्या डॉक्टरला संशोधनाच्या नोबेलसाठी नामांकन मिळण्यासाठी स्वप्न बघून संशोधन वृत्ती वाढीस लावावी, अशी सूचनाही अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी यावेळी केली. संस्थेच्या विकासासाठी अधिष्ठातांनी नेहमी विभाग प्रमुखांशी चर्चा करावी तसेच सर्वांना एका सूत्रात बांधून रुग्णालयाची बांधणी करावी. त्यासोबतच आपल्या कामाचा रोडमॅप तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ज्यामुळे भविष्यात आपल्याला चांगली संधी प्राप्त होऊन आपल्या संस्थेची विशेष ओळख निर्माण होईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण यापुढेही असेच चांगले काम करून संस्थेला भरभराटीस न्याल अश्या शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
'कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले'
संचालक (प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, की या संस्थेचा मी विद्यार्थी असून त्याकाळातील आठवणीने डोळ्याच्या कडा पाणावल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळातील दिवस अत्यंत चांगले व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेचा प्रारंभापासूनचा इतिहास बघितला तर या संस्थेला प्रत्येक क्षेत्रात प्रथम येण्याचे व्यसन लागले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यादृष्टीने वैद्यकीय क्षेत्रात ही संस्था प्रथम असून केईएम रुग्णालय आरोग्य क्षेत्राची जननी असल्याचे त्यांनी सांगितले. येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची धडपड बघितल्यानंतर याची आपल्याला प्रचिती येत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेची पार्श्वभूमी मांडली. त्यानंतर वार्षिक अहवालाचे तसेच कोविड प्रशस्तीपत्र प्रमाणपत्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.