मुंबई - पावसापूर्वी प्रवाहामधून गाळ काढणे, लोहमार्गाची स्वच्छता करणे ही कामे वेगाने केली जात आहेत. या कामांची महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता सुरेश पाखारे यांनी रविवारी (दि. 22 मे) सकाळी रेल्वेच्या विशेष बोगीतून प्रवास करीत संयुक्त पाहणी केली. या दरम्यान स्वच्छतेचे काम समाधानकारक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
रेल्वे रूळाखालील नालेसफाई - मुंबई महानगरात पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करण्याचे काम केले जाते आहे. यंदाही महानगरपालिकेने मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन मिळून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्टची स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. या कामांना वेग देण्यासह विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावणे, आवश्यक तेथे वृक्ष छाटणी करणे ही कामे मे अखेरीस पूर्ण केली जाणार आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर रविवारी पाहणी करण्यात आली. रेल्वे रूळाखालील कल्वर्ट आणि रेल्वे रुळांवर झालेल्या स्वच्छतेचे काम समाधानकारक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
पूर्व उपनगरातील रस्ते व पुलांचीही पाहणी - उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावर पाहणी केल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी पूर्व उपनगरातील वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची तसेच रस्ते आणि रेल्वे मार्गांवरून जाणाऱ्या पुलांच्या ( ROB ) कामांची पाहणी केली. मुलुंडमधील लालबहादूर शास्त्री मार्गावरील बाउंड्री नाला, बॉम्बे ऑइल मिल नाला, अपना बाजार जवळील रेल्वे मार्ग खालून जाणारा भुयारी रस्ता, वालजी लढ्ढा रस्ता, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता रुंदीकरण अंतर्गत नाहूर रेल्वे स्थानकपार जाणारा पूल, विक्रोळी रेल्वे स्थानक पार जाणारा पूल, विद्याविहार स्थानक पार जाणारा पूल इत्यादी कामांची वेलरासू यांनी पाहणी केली आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते दिशानिर्देश दिले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विहित मुदतीत आवश्यक ती कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
हेही वाचा - Fuel Rate Reduction : इंधन दरकपात आणि राजकीय प्रतिक्रिया; वाचा, कोण काय म्हणालं...