मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यासाठी सरकारने ब्रेक-द-चेन अंतर्गत पाच स्थरात निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईचा तिसऱ्या स्थरात समावेश झाला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात मुंबई महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर दिलेला भर, यामुळे मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे. परंतु शहरातील लोकसंख्या आणि गर्दी पाहता कोरोनाचा पुन्हा प्रसार होण्याची शक्यता असल्याने आजही तिसऱ्या स्थरातील निर्बंध लागू आहेत. यामुळे मुंबईकर नागरिकांना आणखी काही काळ निर्बधांमध्ये राहावे लागणार आहे.
मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा -
मुंबईमध्ये ११ मार्च २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत ७ लाख १९ हजार ९४१ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १५ हजार २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ लाख ८७ हजार ५५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईमध्ये १४ हजार ८६० सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आतापर्यंत एकूण ६७ लाख ५३ हजार ६६६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पहिली लाट ओसरत होती. फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट आली आणि तीही आता ओसरत आहे. यामुळे राज्य सरकारने १४ एप्रिलला लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यामधील पॉझिटिव्हिटी रेट आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड्स यावर राज्य सरकारने पाच स्थर केले आहेत. त्यात मुंबईचा पॉजिटिव्हिटी रेट ५.२५ टक्के असल्याने मुंबईचा समावेश तिसऱ्या स्थरात झाला होता. मागील आठवड्यात हा रेट ४.४० टक्के तर आता हा रेट ३.७९ टक्क्यावर आला आहे. तसेच २३.५६ टक्के इतकेच ऑक्सिजन बेडवर रुग्ण असल्याने मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे.
मुंबईचा स्थर उंचावला -
कोरोनाची दुसरी लाट आल्याने आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे १४ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. रुग्णसंख्या कमी झाल्याने ७ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना सरकराने पाच स्थर निश्चित केले. त्याप्रमाणे नियमही सरकारने आखून दिले आहेत. देशाला मुंबई मॉडेलचे धडे देणारी मुंबई मात्र तिसऱ्या स्थरात होती. मुंबईत ४ जून पर्यंत ५.२५ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. ४ जून ते ११ जून या आठ दिवसात ४.४० टक्के इतका रेट कमी झाला. ११ जून ते १८ जून या आठ दिवसात पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी होऊन ३.७९ टक्के इतका झाला.
पॉझिटिव्हिटी रेट घसरला -
मुंबईत ४ ते ११ जून या आठ दिवसांच्या कालावधीत २ लाख ६९ हजर ५६९ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामुळे पॉजिटिव्हिटी रेट ४.४० टक्के इतका होता. याच कालावधीत १२ हजार ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण होते. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त होते. एकूण बेड्सपैकी २७.१२ टक्के बेड्वर रुग्ण होते. यामुळे मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला होता. आता ११ ते १८ जून या कालावधीत १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. २ हजार ९६७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत २३.५६ टक्के बेडवर रुग्ण असल्याने राज्य सरकारच्या ब्रेक-द-चेन नियमानुसार मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे.
पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर भर -
मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सतत पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यात ब्रेक-द-चेन अंतर्गत मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या ३.७९ टक्के असून २३.५६ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण असल्याने मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे. तरीही मुंबईमध्ये तिसऱ्या स्थराचेच निर्बंध आठवडाभर लागू राहतील. तसेच येत्या चार आठवड्यात मुंबईमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देता येणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
राबवण्यात आलेल्या उपाययोजना -
पालिकेने ‘मिशन झिरो’, 'डॉक्टर आपल्या दारी', 'घरोघरी जाऊन तपासणी', 'ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग' आणि 'ट्रिटिंग' हे '४ टी मॉडेल', 'कोरोनाच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी', 'रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे', ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी', 'मी जबाबदार' आदी उपायोजना राबवण्यात आल्या आहेत. शहरात घराबाहेर असताना नाक आणि तोंड झाकेल, असा मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे कोरोना आटोक्यात आला आहे.
असे आहेत निर्बंधांचे स्तर -
राज्यभरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर बनविण्यात आले आहे.
- स्तर 1 - ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यापेक्षा कमी व्यापलेले असतील.
- स्तर 2 - ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.
- स्तर 3 - पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
- स्तर 4 - ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले असेल.
- स्तर 5 - जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले असेल.
हेही वाचा - कोरोनाची तिसरी लाट दीड ते दोन महिन्यांत येणार- एम्सचा इशारा