मुंबई - सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असणारी माऊंट मेरी जत्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात आठ दिवस ही जत्रा भरत असते. 8 सप्टेंबर हा माऊंट मेरीचा जन्मदिवस मानला जातो. यानंतर येणाऱ्या रविवारपासून पूढील आठ दिवस जत्रा भरवण्यात येते. फक्त ख्रिश्चन नव्हे तर सर्व धर्मीय भाविक मदर मेरीचे दर्शन आणि जत्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदा मात्र भाविकांना जत्रा आणि दर्शनापासून दूर राहावे लागणार आहे. भाविकांना मदर मेरीचे दर्शन घेण्यात येणार नसले तरीही माससाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे चर्चकडून सांगण्यात आले आहे.
मदर मेरीचा जन्मदिवसाचे औचित्य साधत हा धार्मिक वार्षिक सोहळा म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी होणाऱ्या वांद्रे येथील या जत्रेच्या वेळेला हजारोंनी लोक प्रार्थनेसाठी येतात. जत्रेच्या वेळीस हा संपूर्ण परिसर फुलांच्या माळा, रिबिन्स लावून सजवला जातो. मात्र, कोरोनामुळे ही जत्रा यावर्षी नागरिकांना साजरी करता येणार नाही.
हेही वाचा - गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता - परिवहन मंत्री
माऊंट मेरी - चर्चचा इतिहास ...
हे चर्च 1640 मध्ये बांधले गेले आणि 1761 मध्ये त्याची पुनर्रचना केली. सध्याची चर्चची इमारत फक्त 100 वर्ष जुनी आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर अनेक सण घरच्या घरी साजरे करावे लागले आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशी माऊंट मेरी जत्रा देखील यावेळी रद्द करण्यात आली आहे. आम्ही दरवर्षी या जत्रेला न चुकता हजेरी लावतो. मात्र, यावेळी आम्हाला या जत्रेत जाता येणार नाही आहे. आम्ही या जत्रेला खूप मिस करणार आहोत. मात्र, पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण कुटूंबासह जाणार आहोत, असे भाविकांनी सांगितले.