मुंबई - मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी ८ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ सहा मुलांची ट्रायल करण्यात आली आहे. ट्रायलसाठी लहान मुलांच्या नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याने पालक-मुलांनी यासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक आणि नायरचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी केले आहे.
लसीकरण मोहीम -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून गेल्या दीड वर्षात सात लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सोळा हजाराहून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या असून दुसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. १६ जानेवारीपासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लवकरच लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे.
तीन गटात होणार लसीकरण -
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये १४ नोव्हेंबरपर्यंत १८ वर्षांवरील लाभार्थ्यांना एकूण १ कोटी ३३ लाख ५९ हजार ६७८ डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ८५ लाख ७८ हजार ६८५ जणांनी पहिला डोस तर ४७ लाख ८० हजार ९९३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पालिकेला मिळालेल्या नव्या गाइडलाइननुसार आता २ ते १८ वर्षे वयोगटासाठी तीन गट करण्यात आले आहेत. यामध्ये २ ते ७ वर्षे, ८ ते ११ आणि १२ ते १८ वर्षे असे वयोगट तयार करण्यात येणार आहेत.
अँटीबॉडीज आढळलेल्यांचे ट्रायल नाही -
पालिकेने अलीकडेच केलेल्या सेरो सर्वेक्षणानुसार ५० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणात अँटीबॉडीज आढळलेल्या मुलांमध्ये गाइडलाइननुसार लसीकरणाचे ट्रायल घेता येणार नाही. ट्रायलसाठी अँटीबॉडीज तयार झाले नसलेल्या मुलांची आवश्यकता असल्याने त्यासाठी प्रतिसाद वाढण्याची गरज असल्याचे डॉ. भारमल म्हणाले.
ट्रायलसाठी नोंदणी करा -
तर लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात होणार असल्यामुळे नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. यासाठी २३०२७२०५ आणि २३०२७२०४ असे दोन दूरध्वनी क्रमांक नोंदणीसाठी देण्यात आले आहेत. ट्रायलसाठी नोंदणी सुरू असून पालक-मुलांनी यासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक आणि नायरचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी केले आहे.