मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल ( Mumbai Ward reservation lottery ) केले आहे. त्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ जुलैला पुन्हा नव्याने प्रभाग आरक्षण लॉटरी काढली जाणार आहे. आरक्षण बदलले जाणार असल्याने निवडणुकीपासून वंचित झालेल्या इच्छुकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष या लॉटरीकडे लागले आहे.
हेही वाचा - धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे निवडणूक आयोगासमोर आमनेसामने
आरक्षण लॉटरी - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आरक्षण लॉटरी काढण्यात आली होती. त्यावेळी ओबीसी आरक्षण नसल्याने २३६ प्रभागांमधून अनुसूचित जातीच्या १५, अनुसूचित जमातीच्या २, तसेच ५० टक्के महिला असे प्रभाग आरक्षित करण्यात आले होते. लॉटरी दरम्यान २००७, २०१२, २०१७ च्या निवडणुकीत जे प्रभाग आरक्षित नव्हते ते प्राधान्यक्रम १,२,३ या पद्धतीने आरक्षित करण्यात आले. तर जे प्रभाग आरक्षित नव्हते ते प्रभाग आरक्षित करण्यात आले होते.
नव्याने आरक्षण लॉटरी - आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे, पालिका निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने लॉटरी काढावी लागणार आहे. ही लॉटरी २९ जुलैला काढावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लॉटरी काढताना अनुसूचित जातीचे १५ आणि अनुसूचित जमातीचे २ प्रभाग तसेच ठेवून महिला आरक्षण रद्द करण्यात आले आहे. उर्वरित २१९ प्रभागांमधून ओबीसी आणि महिला आरक्षण अशी लॉटरी काढली जाणार आहे.
६३ ओबीसी प्रभाग - आता एकूण २३६ प्रभागांपैकी अनुसूचित जातीचे १५ आणि अनुसूचित जमातीचे २ असे १७ प्रभाग आरक्षित ठेवून इतर २१९ प्रभागांमधून ओबीसींसाठी ६३ प्रभाग आरक्षित केले जातील. त्यामधून ३२ प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यासाठी लॉटरी काढण्यात येईल. त्यानंतर उर्वरित प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. पालिकेत मागील निवडणुकीत २२७ पैकी ओबीसीसाठी ६१ प्रभाग राखीव होते. पालिकेत २३६ प्रभाग झाल्याने ओबीसीसाठी ६३ प्रभाग राखीव झाले आहेत. ओबीसीच्या प्रभागात २ ने वाढ झाली आहे.
एकूण प्रभाग - २३६
अनुसूचित जाती - १५ (८ महिला)
अनुसूचित जमाती - २ (१ महिला)
ओबीसी - ६३ (३२ महिला)
सर्वसाधारण महिला - ७८
खुला वर्ग - ७८
असा असेल लॉटरीचा कार्यक्रम -
आरक्षण लॉटरी सोडतीची नोटीस - २६ जुलै २०२२
ओबीसी, महिला आरक्षण सोडत - २९ जुलै २०२२
आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे - ३० जुलै २०२२
हरकती व सूचना - ३० जुलै ते २ ऑगस्ट २०२२
अंतिम आरक्षण परिशिष्ट राजपत्रात प्रसिद्ध करणे - ५ ऑगस्ट २०२२
हेही वाचा - Bail application of MVA leaders : महाविकास आघाडीतील नेत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला