मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिमचा ( Dawood Ibrahim ) भाऊ इकबाल कासकर ( Iqbal Kaskar ) याचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील तपासासाठी ताबा मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या PMLA बेंचने ईडीला इकबाल कासरचा ताबा ईडीला द्यावा, यासाठी वॉरंट जारी केला आहे.
इकबाल कासकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. यापुर्वीही एनसीबीने इकबाल कासकरला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले होते. याप्रकरणी आतापर्यंत चार ते पाच जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर, आणखी काही जणांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच, छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवाला याला सुद्धा अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. मात्र, अद्याप तो अंमलबजावणी संचालनालयन कार्यालयात पोहोचला नाही.
इकबाल कासकरच्या चौकशीसाठी केला होता न्यायालयात अर्ज - मंगळवारी ( दि. 16 फेब्रुवारी ) मुंबईत अनेक ठिकाणी ईडीने मनी लॉन्ड्रिंग ( Money Laundering ) प्रकरणात छापेमारी केली होती. यानंतर आज दाऊद इब्राहिमच्या भावाची तपासासाठी ईडीने कोठडी मागितल्याने आता यामध्ये अनेक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयने ( ISI ) अंडरवर्ल्डचा आधार घेतला असल्याचे समोर आले होते. मुंबईतून पंजाबमध्ये पैसे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा ( National Investigation Agency ) ने ईडीची मदत घेत मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता - केंद्रीय गृहमंत्रालयाने दाऊद इब्राहिमच्या तपासाचे सूत्र एनआयएकडे सोपवल्यानंतर, एनआयएने दाऊद इब्राहिम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर एनआयए आणि ईडीने काल मुंबईत छापेमारी केली होती. त्यामध्ये गँगस्टर अबू सलीमचा मेव्हणा सलीम फ्रुट याला चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्याला सोडून दिले होते. मात्र, काही कागदपत्र घेऊन सलीमला आज ईडी कार्यालयात बोलवले आहे. सलीम फ्रुट याच्याकडून अनेक बाबी समोर आल्याने आता हा तपास इकबाल कासकरपर्यंत पोहोचला आहे.
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर ( Haseena Parkar ) हिच्या घरीसुद्धा मंगळवारी ईडीने तपास केला आहे. दाऊद इब्राहिम याच्या संबंधित असलेल्या अनेक लोकांवर मंगळवारी ईडीने छापे टाकले असून मुंबईत 9 तर ठाण्यात एका ठिकाणी ईडीने छापे टाकून तपास केला आहे.