मुंबई - दिवाळी ८ दिवसांवर आलेली असतांना अजूनही मुंबईतील शाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नसल्याने पालक व शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या या पूर्वी जाहीर करण्यात आल्या होत्या, मुंबईत मात्र शाळांकडून दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या नसल्याने पालकांना दिवाळीच्या सुट्टीतले नियोजन करता येत नव्हते. अखेर आज मुंबईतील शाळांना १ ते २० नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.
सुट्या जाहीर न झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता
कोरोनामुळे मागील दीड वर्षात अनेक पालक आपल्या गावी जाऊ शकले नाहीत आता कोरोना संसर्ग थोडा कमी झाल्याने अनेक पालक आपल्या मूळ गावी वा इतर ठिकाणी जाण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यासाठी रेल्वेचे आरक्षण करणे गरजेचे आहे तर मुंबईतील शिक्षकही कोरोना काळ असल्याने तसेच कोविड काळात कोरोना योद्धे म्हणून अनेक जबाबदारी त्यांच्यावर असल्याने ते आपल्या मूळ गावी जाऊ शकले नाहीत. मुंबईतील जवळपास ७० टक्के शिक्षक दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी जात असतात त्यासाठी गाड्यांचे आधीच आरक्षण करावे लागते मात्र शाळांकडून दिवाळीच्या सुट्या जाहीर न झाल्याने आरक्षण कसे करावे या चिंतेत मुंबईतील शिक्षक व पालक वर्ग होता.
पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू होणार
या वर्षी उन्हाळी सुट्टी २ मे २०२२ ते १४ जून २०२२ पर्यंत असणार आहे व पुढील २०२२-२३ शैक्षणिक वर्ष १५ जुन २०२२ पासून सुरू होणार आहे.
भाजप शिक्षक आघाडीने केली होती मागणी
भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी २० ऑक्टोबर रोजी मुंबईचे शिक्षण उपसंचालक तसेच बृहन्मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षकांकडे निवेदन देऊन दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी केली होती. अखेर यासंदर्भातील आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्याने सुट्ट्यांचा घोळ मिटला असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.
हेही वाचा - साधू संत तपासणार स्क्रिप्ट, मगच मिळेल 'मध्य प्रदेश'मध्ये शूटिंगला परवानगी प्रज्ञा ठाकूर