मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतर्गत सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा व सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करत इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांची घेतला आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे शक्य नसेल तर मुंबई क्षेत्रांतर्गत ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे नियोजन करण्याच्या सुचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे नियोजन करा -
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येतात. यापूर्वी ही परीक्षा 23 मे रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी हित लक्षात घेऊन शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर ही परीक्षा उद्या (१२ ऑगस्ट) ला घेण्यात येणार आहे. मात्र, शिष्यवृत्तीची परीक्षा मुंबईत होणार नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतर्गत सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा व सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करुन शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
![scholarship examination](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-7209757_11082021161552_1108f_1628678752_336.jpg)
सदर परीक्षा पुढे ढकलणे शक्य नसेल तर मुंबई क्षेत्रांतर्गत ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे नियोजन करण्याच्या सुचना मुंबई महानगर पालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत. अन्यथा ऑगस्ट २०२१ अखेर सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा सुचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
शिक्षक परिषदेने केली होती मागणी -
महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली होती. याबाबत शासनाशी पत्रव्यवहार शिक्षक परिषदेने केला होता. आज सकाळपासून शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे मुंबई मनपा कार्यालयात जाऊन बसले होते. सर्वच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार व्हावा. याबाबत मागणी केली होती. याला यश आले आहे. सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.