मुंबई - मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस विभागाने ( Social Service Branch of Mumbai Police ) अंधेरी भागातील दिपा बारवर छापा ( Mumbai Police Raids a Dance Bar in Andheri) टाकला. यावेळी 17 बारबालांना तळघरातून पकडण्यात आले. मेकअप रूमच्या भिंतींवरच्या आरशांच्या मागे गुप्त तळघर होते. या तळघरात बारबाला लपल्या होत्या.
पोलिसांचा छापा पडताच बारबालांना बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्गही तयार करण्यात आला होता. जवळपास 15 तास चाललेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी 17 बारबालांना अटक केली आहे. तसंच बारचा मॅनेजरसह तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एका स्वयंसेवी संस्थेकडून माहिती मिळताच सोशल सर्व्हिस विभागाच्या पथकाने रात्री 11.30 ते 12.30 च्या सुमारास छापा टाकला. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या डान्सबारमध्ये आधुनिक इलेक्ट्रिक सिस्टिमची एवढी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती की, इथे पोलिसांची गाडी बारमध्ये घुसली आणि डोळ्याच्या झटक्यात सर्व बारबाला डान्स फ्लोअरवरून गायब झाल्या.
पोलिसांची संपूर्ण टीम आणि एनजीओची टीमने डान्स बार, बाथरूम, स्टोरेज, रूम्स, किचनसह बारमधील प्रत्येक कोपरा शोधला, पण काहीही बाहेर आले नाही. बारच्या मॅनेजरचीही चौकशी करण्यात आली. मात्र, त्याने बारमध्ये बारबाला असल्याचे नाकारले. शेवटी पुन्हा एकदा सोशल सर्व्हिस विभागाच्या पथक मेकअप रूममध्ये गेले. तेव्हा त्यांची नजर भिंतीवरील मोठ्या आरशावर गेली. काच भिंतीपासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अडचण येत असल्याने पथकाचा संशय बळावला. माहिती मिळताच डीसीपी राजूभुजबळही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मोठा हातोडा मागवून भिंतीच्या काचा फोडण्याचे आदेश दिले.
अथक परिश्रमानंतर जेव्हा भिंत आणि त्यावरील काच फुटली तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. आरशाच्या मागे पोकळी नावाची एक मोठी गुप्त खोली होती. त्याची क्षमता इतकी होती की त्यात एकूण 17 बारबालांना लपवून ठेवण्यात आले होते.यानंतर तळघरातून एकामागून एक बारबाला बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. अखेर या तळघरातून एकूण 17 बारबालांना बाहेर काढण्यात आले.
मात्र, अखेरपर्यंत या गुप्त तळघराचा रिमोट कंट्रोल कुठे होता, ज्यातून हे तळघर उघडण्यात आले, याचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले. या तळघरात एसी होते, कोल्ड्रिंक्स होते, खाद्यपदार्थांची पाकिटे होती. पण व्हेंटिलेशनची व्यवस्था नव्हती. पंधरा तासांच्या कारवाईनंतर बार मॅनेजर आणि कॅशियरसह एकूण 17 बारबालांवर आणि 3 कर्मचाऱ्यांवर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या, बार सीलबंद आहे.