मुंबई - कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव प्रादुर्भाव लक्षात घेता यावर प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना केली जात आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात मास्क व हॅन्ड सॅनिटायझरची मोठी मागणी आहे. मात्र बाजारात हॅन्ड सॅनिटायझरचा पुरवठा कमी असल्यामुळे याचा काळाबाजार एकीकडे होत असताना दुसरीकडे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवण्याचा प्रकारही मुंबईतील साकीनाका परिसरामधून समोर आलेला आहे .
मुंबई पोलिसांच्या युनिट 7ने केलेल्या कारवाईदरम्यान साकीनाका परिसरांमध्ये उत्पादनाचा कुठलाही परवाना नसताना लाखो रुपयांचे हॅन्ड सॅनिटायजर बनवण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड मारून लाखो रुपयांचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर जप्त केले आहे.
मुंबई पोलिसांच्या युनिट 7ने साकीनाका परिसरातील 90 फीट रोड या ठिकाणी असलेल्या सिनर्जी हायजेनिक कॉर्पोरेशन या कंपनीवर छापा मारला असता या ठिकाणी पोलिसांना प्रत्येकी 499 रुपये किंमतीच्या 500 मिली लिटरच्या 1632 हॅन्ड सॅनिटायझरच्या बाटल्या मिळून आल्या. तर प्रत्येकी 2850 किंमतीचे 5 लिटरचे 360 कॅन मिळून आले, जप्त केलेल्या बनावट हॅन्ड सॅनिटायझरची बाजारातील किंमत 22 लाख 13 हजार 939एवढी आहे. कुठलाही परवाना नसताना बनावट हँड सॅनिटायझर बनविण्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी सिनर्जी हायजेनिक कॉर्पोरेषनचा मालक दिलीप गोकुळ चमरिया (32) यास अटक केली आहे. अटक आरोपीवर या पूर्वी पुण्यात असे गुन्हे दाखल असल्याचे, पोलीस तापासत समोर आले आहे.
आतापर्यंत या आरोपीने बनावट हॅन्ड सॅनिटायझर कुठल्या कुठल्या परिसरात विक्रीस दिले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. या बरोबरच आरोपीच्या कारखान्यात यासाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत.