मुंबई - शहर परिसरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये पोलिसांकडून मुंबई शहरातील 94 पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 7911 मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्या व दंड भरण्यास असमर्थ असलेल्या नागरिकांना समज देऊन मुंबई पोलीस सोडत आहेत.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मुंबई शहरात गेल्या काही महिन्यात आतापर्यंत 11,711 मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतून 4395 मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, मध्य मुंबईतून 773 तर पूर्व मुंबईतून 1317, पश्चिम मुंबईतून 1340 तर उत्तर मुंबईतून 2652 नागरिकांवर मास्क न वापरण्याच्या नियमाखाली पोलिसांनी कारवाई केली आहे.
अशी झाली आहे कारवाई
20 मार्च 2020 ते 23 फेब्रुवारी 2021 या काळामध्ये मुंबई शहरात आतापर्यंत कलम 188 अन्वये तब्बल 27 हजार 723 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतून 6506 गुन्हे दाखल झाले असून मध्य मुंबईतून 2892, पूर्व मुंबईतून 3755, पश्चिम मुंबईतून 3162 तर सर्वाधिक उत्तर मुंबईतून 10708 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या दाखल गुन्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांसंदर्भात गुन्हे दाखल असून हॉटेलला नियमापेक्षा अधिक वेळ चालू ठेवणे, इतर दुकाने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध वाहतूक व मास्क न वापरण्याच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले आहेत.
कोरोना नियम पाळा
कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे, अन्यथा त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर बाळगणे , वारंवार हात धुणे व चेहऱ्यावर मास्क लावणे या संदर्भात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबईतील गर्दीची ठिकाणे ही मुंबई पोलिसांच्या नजरेत असून नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.