मुंबई : राज्याच्या गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने आज सकाळी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. २०१८ सालच्या एका आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ही कारवाई केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्णब यांना आता अलिबागला नेण्यात येत आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण..
२०१८च्या मे महिन्यात अन्वय नाईक (५३) या इंटेरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती. त्याच्यासोबत त्याच्या आईनेही आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांना अन्वय नाईक यांनी लिहिलेली आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी समोर आली होती. या चिठ्ठीमध्ये अन्वयने अर्णब गोस्वामीवर आपले पैसे थकवल्याचा आरोप केला होता. अर्णबने आपले ५.४० कोटी रुपये थकवल्यामुळे आपण आर्थिक संकटात आल्याचा या चिठ्ठीत उल्लेख होता.
सीआयडी चौकशीचे आदेश..
२०२०च्या मे महिन्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. अन्वय नाईक यांची मुलगी अज्ञा नाईकच्या मागणीवरुन हे आदेश देण्यात आले होते. अलीबाग पोलिसांनी याप्रकरणी अर्णब गोस्वामीचा तपास केला नसल्याचा आरोप अज्ञा यांनी केला होता.
हेही वाचा : अशीही दिवाळी : सण साजरा करण्यासाठी लुटले कपड्याचे दुकान