मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा मुंबई पोलिसांनी केलेला तपास हा प्रोफेशनल व सत्यावर आधारित आहे. सोशल माध्यमांवर बनावट अकाउंटवरून मुंबई पोलिसांविरोधात शिवीगाळ करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयच्या हाती कुठलेही ठोस पुरावे न मिळाल्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्ट एम्सकडे पाठवण्यात आला होता. एम्सने सुशांतसिंहचा मृत्यू हा आत्महत्याच असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासूनच योग्य दिशेने तपास करण्यास सुरुवात केलेली होती. सुशांतसिंह राजपूतने त्याच्या बांद्र्यातील घरामध्ये आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासाचा भाग म्हणून कूपर रुग्णालयाचे डॉक्टर व फॉरेन्सिक टिम ही मुंबई पोलिसांसोबत काम करीत होती. सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणी सुरुवातीच्या तपासात जे काही पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले होते. ते सर्व पुरावे सर्वोच्च न्यायालयात मुंबई पोलिसांनी दिले होते. मुंबई पोलिसांनी सीबीआयला पुरावे दिल्यानंतर सुशांतसिंहचा मृत्यू आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलिसांनी केलेला तपास सत्यावर आधारित होता. हे स्पष्ट होत असल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.
सोशल माध्यमांवर बनावट अकाउंटवरून शिवीगाळ करणाऱ्या विरोधात होणार कारवाई
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांच्या विरोधात सोशल माध्यमांवर बनावट अकाऊंट बनवून शिवीगाळ केली जात होती. मुंबई पोलिसांच्या विरोधात विनाकारण एका विशिष्ट उद्देशाने मोहीमसुद्धा चालवली जात होती, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलेले आहे. असे बनावट अकाउंट शोधून संबंधित व्यक्तींच्या विरोधात कारवाई होणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी केली नव्हती तक्रार
सुशांतसिंहने आत्महत्या केलेल्या दुसऱ्या दिवशी 16 जूनला त्याचे वडील, त्याच्या बहिणी या सर्वांची मुंबई पोलिसांनी चौकशी करून जबाब नोंदवले होते. यावेळेस त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याने सुशांतसिंहच्या मृत्यूसंदर्भात संशय नसल्याचे म्हटले होते. तेव्हा सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांनी म्हटले होते, की आम्हाला सुशांतसिंहच्या मृत्यू संदर्भात कुठलीही शंका नाही. कोणा विरोधात तक्रार नाही. मात्र , एक महिन्यानंतर बिहार पोलिसांकडे सुशांतसिंहच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.