मुंबई - राज्यात मागील दीड महिन्यापासून उच्च तंत्र शिक्षणाच्या अंतर्गत येत असलेल्या अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॅपराऊंड घेण्यात आले आहेत. त्यात नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही यात प्रवेश मिळावा म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली हेाती. मात्र, या मुदतीनंतरही अभियांत्रिकीच्या तब्बल ६० हजारांच्या दरम्यान जागा रिकाम्या राहिल्या असल्याचे सांगण्यात येते आहे.
अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आपले अर्ज भरण्याची अखेरची मुदत शनिवारी होती. या मुदतीनंतरही काही शाखांच्या तब्बल ६० टक्के जागा रिकाम्या राहील्या आहेत. इतकेच नव्हे तर मागील काही वर्षांमध्ये मागणी असलेल्या संगणक आणि आय.टी. या अभ्यासक्रमांच्या जागाही मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचा अपवाद वगळता रिकाम्याच राहिल्या आहेत.
हेही वाचा... अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 टक्के आर्थिक मागास वर्गाचे आरक्षण होणार लागू
हेही वाचा... वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी १५ लाखांची मागणी; वेळीच लक्षात आली फसवणूक
मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य व अभियांत्रिकी विषयातील तज्ज्ञ प्रा. डॉ. वैभव नरवाडे यांनी यासंदर्भात 'ईटीव्ही भारत' सोबत बातचीत केली आहे...
- राज्यभरात रिक्त राहणाऱ्या जागांमध्ये पहिले कारण म्हणजे महाविद्यालयांना अधिकाधिक प्रमाणात देण्यात आलेली परवानगी आणि वाट्टेल तेवढे शुल्क आकारण्याचे सुरू केलेले धोरण, यामुळे राज्यभरात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पीक उभे राहिले.
- दुसरे कारण म्हणजे, प्रतिज्ञापत्र देऊन 'खर्चांच्या आधारे शुल्क' असे ठरल्याने अनेक महाविद्यालयांचे शुल्क हे काही लाखांवर पोहोचले. पायाभूत सुविधा नाहीत परंतु शुल्क जास्त आहे, अशी स्थिती असल्याने अनेक महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामुळे जागा रिकाम्या राहत आहेत
- अनेक महाविद्यालयांमध्ये १२ महिन्यांपर्यंतचे वेतन प्रलंबित राहिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी कमी आल्याने शुल्क कमी येते आणि शिक्षकांना वेतन दिले जात नाही. यामुळे एकुणच अभियांत्रिकी व्यवस्था ही पूर्णपणे डबघाईला आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याने अभियांत्रिकीच्या जागा या रिकाम्या राहतात, असेही डॉ. नरवाडे म्हणाले.
राज्यात अनेक महाविद्यालयांमध्ये अर्ध्याहून अधिक जागा रिकाम्या राहणार आहेत. मात्र आताच्या मुदतीनंतर काही जागा भरल्या जातील अशी अपेक्षा अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा... अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित उपकरण
हेही वाचा... वर्ध्यात वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर पालकांना २८ लाखांना गंडा; हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय
अभियांत्रिकीच्या जागांची सद्यस्थिती :
वर्ष | एकूण जागा | प्रवेशित जागा | रिक्त जागा |
२०१९ | १,२७,५३७ | ६५,४४२ | ६२,०८६ |
२०१८ | १,३०,३५६ | ७३,९३४ | ५६,४२२ |
रिक्त राहिलेल्या जागांची शाखानिहाय आकडेवारी :
शाखा | एकूण जागा | प्रवेशित जागा | रिक्त जागा |
मॅकेनिकल | ३३,९०० | ९,५६६ | २४,३३४ |
इलेक्ट्रीकल | ११,९४४ | ३,६९३ | ८,२५१ |
सिव्हील | २०,८३२ | ६,८३० | १४,००३ |
इलेक्ट्रॉनिक्स | २०,०१८ | ८,२१० | ११,८०८ |
संगणक | १७,४७६ | ११,६५४ | ५,८२२ |
आय.टी. | ९,०९४ | ६,४५९ | २,६३५ |