मुंबई - मंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या असून, आतापर्यंत केवळ १०० जुजबी अशा सूचना हरकती आल्या आहेत. या सूचना व हरकतींवर २२ फेब्रुवारीपासून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या समितीपुढे सुनावणी घेतली जाणार असून, २ मार्चला निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला जाणार आहे.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत आज ४२९ नव्या रुग्णांची नोंद, २ रुग्णाचा मृत्यू
प्रभाग पुनर्रचना -
मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. पालिकेचा कार्यकाळ येत्या ८ मार्चला संपत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार असल्याने तसेच, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असल्याने ही निवडणूक एप्रिल महिन्याच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ता असताना भाजपाने आपल्या सोयीची प्रभाग रचना केली होती. त्यामुळे, त्यांचे नगरसेवक जास्त संख्येने निवडून आले, असा आरोप करत पुन्हा प्रभाग रचना नव्याने केली जात आहे. मुंबईमध्ये २२७ प्रभाग होते, लोकसंख्या वाढल्याने राज्य सरकारने त्यात ९ ने वाढ करून २३६ प्रभाग केले आहेत. त्यानुसार नव्याने प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या प्रभाग रचनेचा मसुदा पालिकेने आपल्या वेबसाईटवर १ फेब्रुवारीला प्रसिद्ध केला आहे.
हरकती व सूचना -
पालिकेने केलेल्या प्रभाग पुनर्रचनेवर १४ फेब्रुवारी पर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पालिकेकडे एकूण १०० सूचना व हरकती आल्या आहेत. त्या सर्व सूचना व हरकती जुजबी आहेत. संस्था, असोसिएशन, माजी नगरसेवक आदींनी या सूचना व हरकती दाखल केल्या आहेत. त्यात स्लम माझ्या विभागात असावा, सीमारेषा बदल झाला, माझ्या विभागात हा संबंधित विभाग असावा, अशा हरकती दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
कमिटीपुढे सुनावणी -
प्रभाग पुनर्रचनेबाबत सूचना व हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, कोंकण विभागीय आयुक्त, मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच, पालिका आयुक्त यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या पुढे आता आलेल्या १०० व १४ फेब्रुवारीपर्यंत येणाऱ्या सूचना व हरकती यांवर सुनावणी घेण्यात येईल व त्याचा अहवाल २ मार्चला निवडणूक आयोगाला सादर केला जाईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम -
निवडणूक आयोगाने प्रभाग पुनर्रचनेवर हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारीला निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्र पत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे. 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागवणे, 16 फेब्रुवारीला प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, तर 26 फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनांसंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. 2 मार्चला सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांना केल्या आहेत.
हेही वाचा - Teachers Welcomes Students : विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी आयडियाची कल्पना