मुंबई - शहरात गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यातच पावसाळा जवळ आल्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारावर उपचार करण्यासाठी महापालिका रुग्णालये सज्ज ठेवली जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
महापालिका साथरोग रोखण्यासाठी सज्ज - मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, हिवताप, कावीळ, स्वाईन फ्ल्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनीया असे विविध साथीचे आजार पावसाळ्यात पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात १०० बेड्स तैनात ठेवण्यात आले आहेत. तर केईएम नायर व सायन रुग्णालयासह सर्वसाधारण रुग्णालयांत गरजेनुसार बेड्स अॅक्टीव्ह करण्यात येतील, तसेच औषध, चाचण्या करण्यासाठीही साहित्य उपलब्ध केल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
मलेरिया डेंग्यूच्या चाचण्या घराजवळ - मलेरिया, डेंग्यूसह पावसाळी आजारांची चाचणी आता घराजवळील कोरोना केंद्रावर होणार आहे. कोरोना विषाणुची चाचणी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने २६६ कोरोना टेस्टिंग सेंटर सुरु केले आहेत. त्याच केंद्रावर मलेरिया डेंग्यूच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतल्याचे गोमारे यांनी सांगितले.