मुंबई - मुंबईत गेले अकरा महिने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, आजही काही भागात आणि गृह संकूलांमध्ये कोरोनासंदर्भातील क्वारंटाईन नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. क्वारंटाईन नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या सोसायट्यांना कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. याची सुरुवात चेंबूर मधील सोसायट्यांपासून झाली आहे.

सोसायट्यांना इशारा -
मुंबईतील महापालिकेच्या एम-पश्चिम विभागात येणाऱ्या चेंबूरमध्ये गेल्या ८ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या १५ वरून २५ वर गेली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांत ही संख्या पुन्हा १५ वर आली आहे. प्रदीर्घ लॉकडाऊन तसेच लसीकरणामुळे लोक महापालिका आणि राज्य सरकारने जाहीर केलेले नियम मोडत आहे. विनामास्क फिरणे, सुरक्षित अंतर न पाळणे, गर्दीचे नियम न पाळणे त्याचबरोबर मुख्य म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाईनचे नियम मोडल्यामुळे एकाच घरात किंवा इमारतींमधून कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर चेंबूरमधील काही सोसायट्यांना क्वारंटाईनचे नियम मोडल्याप्रकरणी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, नाही तर कठोर कारवाई करू, असा इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई आणखी कडक करणार असल्याची माहिती एम-पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली.
सोसायट्यांना पालिकेचे निर्देश -
- कामवाल्या बायका, दूधवाला आदी मोजक्या लोकांना प्रवेश द्या.
- शरीराचे तापमान तपासले जावे.
- पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या कुटूंबियांकडून कोव्हीड-१९च्या गाईडलाईनची कडक अंमलबजावणी करावी.
- पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क असलेल्या लोकांनी कोविड-१९च्या चाचण्या कराव्यात.
- कोविडची लक्षणे इतर लोकांमध्ये आढळून आल्यास त्यांनी पालिकेकडून तपासणी करून घ्यावी.
अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत.