मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे थैमान घातले. दुसऱ्या लाटेला धारावीत मात्र प्रवेश करता आला नाही. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाय योजनांमुळे धारावीत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात यश आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे धारावीत हाहाकार उडाला होता. रुग्णांसह रुग्ण दगावण्याची संख्या ही मोठी होती. ही लाट थोपवण्यासाठी 'धारावी पॅटर्न' राबवावा लागला. याची दखल जगभरात घेण्यात आली. मात्र तोपर्यंत धारावीत रुग्ण संख्येने कळस गाठला होता. तर मृतांचा आकडा भयावह वळणावर पोहोचला होता.
यावर्षी साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटी कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर धारावीत पुन्हा एकदा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत होती. दुसऱ्या लाटेचा विनाशरूपी परिणाम पाहता धारावीत ही लाट अधिक जीवघेणी ठरण्याचा धोका होता. त्यामुळे दुसरी लाट थोपवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. धारावीमध्ये कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालिकेने टेस्टिंगसाठी होम सर्व्हिस सुरू केली आहे. मोबाईल व्हॅन टेस्टिंगच्या माध्यमातून हाय रिस्क व्यक्तींच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या. धारावीमधील कामगार वर्ग मोठ्या संख्येने असल्याने, काम जाईल या भीतीने कुणीही क्वारंटाईन व्हायला तयार नव्हते. त्यामुळे धारावीसह माहीम आणि इतर परिसरात घराघरात मोठ्या प्रमाणावर विशेष चाचणी शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.