मुंबई - शहर महानगरपालिकेवर गेले २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात शिवसेनेचे जितके महापौर झाले, त्यात मुंबई शहर आणि विशेष करून वरळी विभागाला झुकते माप देण्यात आल्याचे दिसत आहे. एकट्या वरळी विभागातून आतापर्यंत ५, तर शहर विभागातून ६ महापौर शिवसेनेने दिले आहेत. यामुळे मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नगरसेवकांमध्ये कुरबुर सुरू आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्याने महापौरपदासाठी जाहीर करताना पक्षातून विरोध झाला होता.
हेही वाचा... शिवसेना आमदार पुन्हा हॉटेलमध्ये होणार नजरकैद
मुंबई महापालिकेत १९९८-१९९९ मध्ये महापौर परिषद अस्तित्वात आली. त्यानंतर एकाच वर्षात ही महापौर परिषद रद्द करण्यात आली. त्यानंतर महापौर पद अडीच वर्षाचे करण्यात आले. गेल्या २० वर्षांच्या काळात अडीच वर्षांचा कार्यकाळ पाहणारे १० महापौर झाले आहेत. त्यामधील मुंबई शहर विभागातून दत्ताजी नलावडे, नंदू साटम, महादेव देवळे, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर या पाच जणांनी महापौर पद भूषविले आहे. तर किशोरी पेडणेकर या ६ व्या महापौर आहेत. या सहापैकी श्रद्धा जाधव सोडल्यास इतर दत्ताजी नलावडे, नंदू साटम, महादेव देवळे, स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर हे पाच नगरसेवक एकट्या वरळीमधील आहेत.
हेही वाचा... पीएमसी प्रकरण : तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी ठेवीदारांना मिळू शकतात १ लाख रुपये
पश्चिम उपनगरामधून सुनिल प्रभू, हरेश्वर पाटील, शुभा राऊळ, विश्वनाथ महाडेश्वर या ४, तर पूर्व उपनगरमधून एकट्या दत्ता दळवी यांना महापौर बनण्याची संधी मिळाली आहे. नुकतेच ११ वे महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. गेल्या २० वर्षात शिवसेनेकडून मुंबई शहर विभागाला झुकते माप देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक आहेत. त्यापैकी शहर विभागातून ५६, पूर्व उपनगर मधून ६९ तर पश्चिम उपनगर मधून १०२ नगरसेवक निवडून येतात. त्यानंतरही पूर्व आणि पश्चिम उपनगरकडे शिवसेनेकडून दुर्लक्ष केले जात असल्याची कुरबुर नगरसेवकांमध्ये आहे.
गेल्या २० वर्षातील मुंबईचे महापौर :
मुंबई शहर -
- दत्ताजी नलावडे
- नंदू साटम
- महादेव देवळे
- श्रद्धा जाधव
- स्नेहल आंबेकर
- किशोरी पेडणेकर
पश्चिम उपनगर -
- सुनिल प्रभू
- हरेश्वर पाटील
- शुभा राऊळ
- विश्वनाथ महाडेश्वर
पूर्व उपनगर -
- दत्ता दळवी