मुंबई - पालिका प्रशासनाने यंदा कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानात कोणतीही वाढ न करता मागील वर्षी प्रमाणेच यंदा 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
पालिकेत सुमारे 1 लाख 11 हजार कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना पालिका दरवर्षी दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान देत आहे. दरवर्षी या सानुग्रह अनुदानात पालिका प्रशासन वाढ करत असते. मात्र, यंदा सानुग्रह अनुदानात कोणतेही वाढ न करता गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - मुंबई तुंबल्याने १४ हजार कोटींचा फटका, श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
आगामी विधानसभा निवडणुका दिवाळीच्या मोसमात होणार आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस आचारसंहितेच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी यंदा कोणत्याही कामगार संघटनेच्या मागणीशिवाय प्रशासनाने पालिका कर्मचार्यांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाने याबाबतचे परिपत्रकच बुधवारी जारी केले. त्यामुळे आगामी वेतनामध्ये या सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचार्यांच्या वेतनात जमा केली जाणार आहे.