मुंबई - मार्च महिन्यापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा प्रसार मुंबईत काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, मृत्यू दर कमी होताना दिसत नाही. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी 'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी'ची घोषणा केली होती. आता पुन्हा महिन्याभराने 'मिशन सेव्ह लाईव्हज' राबवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार मार्चपासून सुरू झाला. मुंबईत सध्या कोरोनाचे 1 लाख 27 हजार 571 रुग्ण असून 6 हजार 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधून 1 लाख 954 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 332 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 79 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 87 दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही.
'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी'
मुंबईत मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महापालिका आयुक्तांनी 'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी'ची घोषणा केली होती. त्यानुसार आयुक्तांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली होती. मृत्यूचे व्हिडिओ ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. रात्री 1 ते पहाटे 5 दरम्यान मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन काढून रुग्ण शौचालयात जात असल्याने त्यांना बेडजवळ पॉट देण्याचेही आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते.
'मिशन सेव्ह लाईव्हज'
त्यानंतरही मुंबईतील मृत्यू दर कमी झालेला नाही. मुंबईत सध्या 5.5 टक्के मृत्यू दर आहे. हा दर 3 टक्क्यांवर आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी 'मिशन सेव्ह लाईव्हज' सुरू केले आहे. त्यानुसार वृद्ध आणि कोरोना रुग्णांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. खासगी रुग्णालयातील मृत्यूंचे ऑडिट केले जाणार आहे. प्रत्येक कोरोना मृत्यूचा शोध घेण्याच्या सूचना वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
कोणत्या स्टेजला रूग्णाचा मृत्यू होत आहे, प्रकृती गंभीर होण्यामागे काय कारणे आहेत, त्याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वृद्ध आणि आजारी रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.