मुंबई - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे. यासाठी शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षाकडून मिशन १५० जाहीर करण्यात आले आहे (MUMBAI MISSION 150). सध्या शिवसेना विरुद्ध भाजपा आणि एकनाथ शिंदे गट असा थेट राजकीय वाद पाहायला मिळत आहे (BJP Shiv Sena political fight). हा वाद पालिका निवडणुकीआधी आणखी चिघळणार आहे. या दोन्ही पक्षांकडून मिशन १५० जाहीर करण्यात आले असले तरी मुंबईकर मतदार कोणाला सत्तेत बसवणार आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे (BMC elections 2022).
मुंबईत २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेना सत्तेत - मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार कोटींचा आहे. देशातील लहान सात राज्यापेक्षा महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. यामुळे महापालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हटले जाते. सोन्याची अंडी देणाऱ्या महापालिकेवर आपली सत्ता असावी असे सर्वच राजकीय पक्षांना वाटते. मात्र गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ मुंबईकरांनी शिवसेनेला सत्तेत बसवले आहे. या काळात भाजपा शिवसेनेचा मित्र पक्ष होता. मागील ५ वर्षात पालिकेत भाजप पहारेकऱ्यांची भूमिका बजावत आहे. शिवसेनेची अनेकवेळा भाजपने कोंडी केली आहे. भाजपने गेल्या ५ वर्षात अनेक घोटाळे बाहेर काढून कारवाईसाठी आंदोलने केली आहेत. गेल्या ५ वर्षात भाजपने पालिकेत आक्रमकपणा दाखवला आहे.
महापौर बसवण्याचा संकल्प - राज्यात शिवसेना आणि भाजपची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे पूर्ण होताच शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून ४० आमदार फोडले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. शिंदे आणि भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर भाजपने पालिकेवर आपला महापौर बसवण्याचा संकल्प केला आहे.
मिशन १५० जाहीर - भाजपने मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मिशन १५० जाहीर केले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईला भेट दिली. या भेटीदरम्यान पालिकेवर भाजपाचा महापौर बसवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडवणीस यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करायला सांगितले आहे. मुंबई महानगरपालिकेवर 'अभी नही तो कभी नही' असं सांगत कुठल्याही परिस्थितीत भाजपचा भगवा फडकवावाच लागेल व त्यासाठी जोमाने कामाला लागा, रस्त्यावर उतरा असेही त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेनं १५० चा नारा यापूर्वीच दिला - शिवसेनेनं १५० चा नारा यापूर्वीच दिला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं जर हाच नारा दिला असेल तर त्यांच्या नाऱ्यात आणि वास्तवात जमिन-आस्मानाचे अंतर आहे. अमित शाहांची अवस्था गजनी सारखी का झाली? अडीच वर्षांनंतर दोन जागांसाठी युती तोडली हा साक्षात्कार का झाला? स्थानिक, प्रादेशिक पक्ष संपवायचे हा अजेंडा सर्वांना कळला आहे. कोण कोणाला धोका देतंय, खोके देतंय, कोण कोणाचे बोके पळवतंय हे सगळं लोकांना दिसतंय. आम्ही जमिनीवरच आहोत अजून आम्हाला काय जमिन दाखवताय. भाजपाला आसमानातून जमिन दाखवली पाहिजे. उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं, याकरता गट तट तोडायचे काम भाजप करत आहे. आम्ही दोन दिवसांपूर्वीच मुंबईकरता मिशन १५० नारा दिला आहे. त्यांना कॉपी कायचा असेल तर करु देत अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.