मुंबई - मुंबई मेट्रो १ ने ५ वर्ष पूर्ण केले असल्याने मेट्रोच्या सर्वच स्थानकावर रंगीबेरंगी सजावट करण्यात आली आहे. यावेळी मेट्रो स्थानकावरील तिकीट खिडक्या आणि स्थानकात जातेवेळी आकर्षक सजावट केली असल्याने प्रवासीही समाधानी असल्याचे दिसत होते.
लोकल व बेस्टच्या बेभरवशाच्या वेळेला कंटाळलेल्या प्रवाशांना घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मुंबईतील पहिल्या मेट्रोचा चांगला अनुभव येत आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमधील असलेले सातत्य, स्थानकावर व गाडीत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण, प्रवाशी सुरक्षेची घेतलेली काळजी, स्थानक परिसर व गाड्यातील स्वच्छता, स्वयंचलीत असलेली कार्यप्रणाली, यामुळे मुंबई मेट्रो १ ला सुरुवातीपासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरून दररोज साडेतीन लाख प्रवासी करतात, यात वर्षागणिक वाढ होत आहे.
सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीचा हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. ज्याने मागील ५ वर्षात ५४ कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ दिला आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे अधिक प्रवाश्यांनी या मेट्रोला पसंदी दिली आहे. १२ स्थानके असलेल्या या मेट्रोला ११.४० किमीचा टप्पा असून ६ कोटी १७ लाख फेऱ्या मारत पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडले गेला. त्यामुळेच अधिक प्रवासी या मेट्रोला पसंदी देत आहेत. मागील ५ वर्षे चांगली सेवा देणारी मेट्रो यापुढे अधिक फेऱ्या आणि डबे वाढवत चांगली सेवा देईल हीच अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहे.