मुंबई - देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. अनेक जगप्रसिद्ध लेखक, विचारवंत, तत्त्ववेत्ते यांचे लिखाण, ज्ञानभांडार अनेक देशांमधील विविध ग्रंथालयांनी सांभाळून ठेवले आहे. मानवता, संस्कृती, नीतीमत्ता यांची बिजे याच ज्ञानभांडारांनी जपून ठेवली आहेत. देश-विदेशातील अशी अनेक ग्रंथालये प्रसिद्ध आहेत. सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आणि दुर्मीळ ग्रंथसंपदा असलेले मुंबईतील सर्वात जुने ऐतिहासिक ज्ञानभंडार म्हणून काळा घोडा समोरील डेव्हिड ससूनची ओळख आहे. जुनी पुस्तके, दस्तऐवज, नकाशे, कागदपत्रे असा ५३ हजारांची ग्रंथसामग्री त्यात पुस्तकांना हानी पोहोचवणारी कसर, वाळवी, इतर कीटकांचा बिमोड करून दिवसेंदिवस नवे नव्या तंत्रज्ञानाची भर पडत असतानाही ससून ग्रंथालयातील ( David Sassoon Heritage Library ) ज्ञानभांडराचा ठेवा वाचकांच्या सेवेसाठी दिमतीने उभा आहे.
१८६३ साली ससून ग्रंथालयाचा रचला गेला पाया - सन १८४७ मध्ये मेकॅनिकांचा गट, रॉयल मिंट आणि सरकारी डॉकयार्डचे कर्मचारी यांच्या पुढाकारातून यांत्रिकी मॉडेल आणि स्थापत्यशास्त्राचा आराखड्याच्या अभ्यासासाठी ससून मेकॅनिकल इन्स्टिट्यूटची फोर्ट भागात स्थापना केली होती. भाडे कराराने मेकॅनिक इन्स्टिट्यूट संस्था सुरुवातीला चालवण्यात आली. पुढे डेव्हिड ससून, श्रीमंत, व्यापारी, दानशूर वर्गाने ग्रंथालय उभारणीसाठी १८६३ मध्ये आर्थिक मदत केली. त्यामुळे ससून ग्रंथालय इमारतीचा पाया रचला. दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन पुतळ्यांपैकी काळा घोडा चौकातील जहांगीर आर्ट गॅलरी समोर व्हिक्टोरिअन गॉथिक शैलीतील डेव्हिड ससून ग्रंथालयाची इमारत ( Gothic Sculpture in BMC ) १८७० सालापासून डौलाने उभी आहे. इमारतीच्या उंच ठिकाणी प्रचंड मोठे तीन घड्याळ लावले असून दिवसांतून पाच ते सहा वेळा तरी चावी द्यावी लागत आहे. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ डेव्हिड ससून यांचा पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
जगातील अप्रतिम ४७ ग्रंथालयांमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची झाली गणना - महाराष्ट्र शासनाच्या जागतिक वारसा यादीत या इमारतीचा समावेश आहे. २००६ साली जगातील अप्रतिम ४७ ग्रंथालयांमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची ( David Sassoon Heritage Library ) गणना झाली. या ग्रंथालयाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ३६५ दिवस विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय खुले असते. तीन मजली भव्य इमारतीत पहिल्या मजल्यावर ग्रंथालय आणि वाचनालय आहे. सुरुवातीला ५३ हजारांहून अधिक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतली पुस्तके, सोबतच १८ व्या आणि १९ व्या शतकातील दुर्मीळ दस्तऐवज पुस्तकांचा खजिना पाहण्यास मिळतो. या दुर्मीळ पुस्तकांचे तंत्रज्ञानाच्या मदतीने संगणकीय स्वरूपातही जतन केले आहे. तसेच विविध भाषांची जुनी मासिकेही ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. सध्या १८ हजारांहून अधिक ग्रंथसंपदा आहे. पुस्तके वाचणे, अभ्यासाकरिता खुर्च्या, बाकडे ठेवले आहेत. संस्थेचे सध्या तीन हजार आजीवन सभासद असून नव्याने येणारा विद्यार्थी वर्गही ग्रंथालयाशी जोडला गेला आहे.
ऐतिहासिक ज्ञानभंडार म्हणून ओळख - वाचन संस्कृती हा ग्रंथ साहित्याचा मूलभूत पाया आहे. पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात ग्रंथवाचन होत हो. मन एकाग्र करणे, आध्यात्मिक विचारांचा प्रभाव होत होता. काळ बदलत गेला तसतशा वाचनाच्या पद्धती बदलल्या. आजकालची पिढी वाचतच नाही, त्यांना वाचनात रसच नसतो, वाचनाचे महत्त्वच त्यांना कळत नाही, मोबाईलमध्ये डोके घालून बसतात, अशी अनेकांची ओरड असते. वाचक आणि पुस्तकांतील संवाद कधीच संपत नाही. सध्या पुस्तक वाचण्याची माध्यमे बदलली आहे. ई-बुक्स, डिजिटल बुक्स इत्यादी अनेक प्रकारांचा यात समावेश आहे. दिवसेंदिवस नव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे. मात्र, सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आणि दुर्मीळ ग्रंथसंपदा असलेले मुंबईतील सर्वात जुने ऐतिहासिक ज्ञानभंडार म्हणून ओळख असलेले काळा घोडा समोरील डेव्हिड ससून ग्रंथालयाचा ( David Sassoon Heritage Library ) नावलौकिक आजही तेवढ्याच ताकदीने कायम आहे.
वाचकवर्ग कमी झाल्याची खंत - एकेकाळी ग्रंथालयाकडे वाचकांची रांग लागायची. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. तरुण पिढीला अवांतर वाचनाची सवय नाही. विद्यार्थी वर्गही मुख्यतः परीक्षेच्या अभ्यासासाठी येतो. थोडे विद्यार्थी वाचन करतात. तेही मोबाईल किंवा आयपॅडवरच. जुनी पुस्तके, दस्तऐवज, नकाशे, कागदपत्रे, असा हजारोंच्या संख्येने ग्रंथसामग्री, पुस्तकांना हानी पोहचवणारी कसर, वाळवी, इतर कीटकांपासून वाचवणे जिकरीचे काम आहे. मुलांप्रमाणे त्यांना जपावे लागते. वाचकवर्ग कमी झाल्याची खंत डेव्हिड ससून ग्रंथालयाचे सचिव बलदेव सिंह यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Mumbai Meri Jaan : मुंबई मेरी जान; गॉथिक शिल्पकलेचा नमुना मुंबई महापालिका मुख्यालय