मुंबई - शहर परिसरात कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याने आता रुग्णांवर कोविड जम्बो सेंटरमध्येच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये आता इतर आजारांवरही उपचार केले जाणार आहेत. त्याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात येत आहे, याची पाहणी महापौरांनी नायर रुग्णालयाला भेट देवून केली. यावेळी त्यांना डॉक्टरांना मार्गदर्शन केले तसेच कोरोना रुग्णांशी संवादही साधला.
मुंबई सेंट्रल येथील नायर महापालिका रुग्णालयाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भेट दिली. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांबाबतच्या बाह्य सेवा तसेच आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येत असून त्याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात येत आहे, याची पाहणी करून संबंधित डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
यानंतर पीपीई किट घालून त्यांनी थेट कोरोना बाधितांवर उपचार सुरू असणाऱ्या कक्षात जाऊन पाहणी केली. तसेच प्रत्यक्ष कोरोनाबाधितापर्यंत जाऊन वैयक्तिकरीत्या संवाद साधला. रुग्णांशी संवाद साधताना आपण बरे झाल्यानंतर प्लाझ्मासाठी आपले रक्त हवे असल्यास आपण ते देण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. जेणेकरून आपल्या रक्तामुळे तीन जणांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण लवकर बरे होऊन इतरांची सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महापौरांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या दालनात डॉक्टरांसोबत चर्चा केली. कोरोना कक्षाला भेट दिल्यानंतर महापौरांनी कार्यरत कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना केल्या. जेणेकरून रुग्णसेवेमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये, असे निर्देश उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना महापौरांनी दिले.