मुंबई - राजकारणात नेत्यांमध्ये मतभेद असले पाहिजेत मात्र वैर असता कामा नये, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. तसेच लता मंगेशकर लवकर बऱ्या होऊन घरी याव्यात अशी प्रार्थना महापौरांनी केली.
राजकारणात वैर नको -
काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते मोदींना शिव्या आणि मारण्याचे वक्तव्य करत आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने आशिष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातील वाद बसवून मिटवावा, असे म्हटले आहे. यावर महापौर बोलत होत्या. यावेळी महापौर म्हणाल्या की, नाना पटोले यांचा व्हिडिओ मी बघितला नाही. मात्र आशिष शेलार आणि माझ्यामधील वादावर न्यायालयाने बाहेर बसून वाद सोडवावा, असे म्हटले आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावेत मात्र वैर नसावे, असे मत महापौरांनी व्यक्त केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना महापौर किशोरी पेडणेकर आरोप सिद्धही करा - मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राणीबाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा असल्याची टीका केलीय आहे. तसे पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. यावर बोलताना विरोधक असे आरोप करत असतात. आमचे मित्र पक्ष असलेल्या पक्षातील नेतेही कशी कधी असे आरोप करतात. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने असे आरोप केले जात आहेत. ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराची माहिती असेल त्यांनी आम्हाला द्यावी आम्ही दोषींवर नक्की कारवाई करू. मात्र कोणी नुसते आरोप करू नयेत ते आरोप सिद्धही करावेत असे आवाहन महापौरांनी केले.
लसीकरणासाठी शिवसेना पुढाकार घेणार -
मुंबईमध्ये १५ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला थंडा प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद वाढवण्यासाठी वरळी मतदार संघात शिवसैनिक घरोघरी जाऊन १५ ते १७ वयोगटातील मुलांची नावे नोंद करणार असून त्यांना लसीकरण केंद्रावर त्यांना आणून लसीकरणाची संख्या वाढवणार असल्याचे महापौर म्हणाल्या.
लता मंगेशकर लवकर बऱ्या व्हाव्यात -
भारतरत्न लता मंगेशकर या कोविड न्युमोनिया झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्याची माहिती ते वेळोवेळी पालिकेच्या डी विभाग कार्यालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना देत आहेत. कालच त्यांच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा झाली आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना करत असल्याचे महापौर म्हणाल्या.