मुंबई - मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरू झाला. या हेरिटेज वॉकसाठी घेण्यात येणारे शुल्क महाराष्ट्र पर्यटन मंडळ, महापालिका आणि खाकी टूर्स यामध्ये विभागले जाणार आहे. यामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या महापालिकेच्या इमारतीमधील वॉकचे शुल्क पालिकेच्या वाटणीला कमी प्रमाणात येणार असल्याने यावरून राजकीय टीका होऊ लागली आहे. तर यावर राज्य सरकार आणि महापालिका योग्य तो निर्णय घेईल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क -
मागील वर्षी आर्थिक मंदी, मालमत्ता कर वसूलीत फटका मनपा प्रशासनाला बसला होता. यंदा कोविडच्या महामारीमुळे आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. आर्थिक कोंडीत अडकलेली मुंबई मनपा एकीकडे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधत आहे. आता मुंबई महापालिकेची ब्रिटीशकालीन वास्तू पर्यटनाच्या नावाखाली पर्यटकांसाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी खुली केली आहे. मुंबई मनपाच्या सहकार्याने आणि पर्यटन विकास महा मंडळाच्या माध्यमातून हेरिटेज वॉक घेता येणार आहे. बूक माय शो अॅपवरुन पर्यटकांकडून याकरिता बुकींग करावी लागेल. प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क यासाठी आकारले जाणार आहेत. असे असताना महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या वास्तुचे पैसे तीन जणांमध्ये विभागण्याचा घाट घातला जातो आहे. मुंबई मनपापेक्षा खासगी संस्थेलाच सर्वाधिक फायदा होणार असल्याची टीका विरोधकांकडून सुरु झाली आहे. त्यामुळे हेरिटेज वॉक वादात सापडण्याची शक्यता आहे.
ऐतिहासिक वास्तूंचे पर्यटकांना महत्त्व कळावे -
मुंबई महापालिकेची इमारत १८९३ मध्ये १२ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आली. मुंबई महापालिकेची इमारत ब्रिटीशकालीन असल्याने या वास्तूला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक वास्तूंचे पर्यटकांना महत्त्व कळावे, हा मुंबई महापालिकेचा उद्देश आहे. एमटीडीसी आणि मनपाने यासंदर्भात करार केला आहे. त्यानुसार एमटीडीसीकडून गाईड म्हणून खाकी टूर्सची नियुक्ती केली आहे. त्याबदल्यात खाकी टूर्सला मानधन मिळणार आहे, असे खाकी टूर्सचे संचालक भारत गोठोसकर यांनी सांगितले.
हे चोचले कशासाठी -
एका कुटुंबात चार माणसे असतील तर त्यांचे एका वेळचे शुल्क १२०० रुपये होतील. हे शुल्क सामान्यांना परडणारे नाही. त्यामुळे हे चोचले कशासाठी, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. तसेच या वॉकमधून मुंबई मनपाला किती महसूल मिळणार, याबाबत कोणतेही सुस्पष्टता नाही. प्रशासनाने खुलासा करावा, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
शुल्काबाबत विचार सुरु -
चांगल्या कामांतही विरोधक टीका करतात. त्यांचे कामच आहे टीका करण्याचे. परंतु, तीनशे रुपयांच्या शुल्काबाबत विचार सुरु आहे. मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, मनपा आयुक्त आणि विविध पक्षाचे गटनेते यावर निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.