मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाउन लावण्यात आला. त्यानंतर सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले. मुंबईत कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांवर नाताळ सण आला असून, नवीन वर्षाची धामधूम सुरू होईल. आता मुंबईकरांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. सर्वसामान्यांसाठी बंद असलेला लोकल प्रवास जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आज घोषणा केली. मार्च महिन्यात फोफोवलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे ठप्प पडलेली मुंबईची 'लाईफलाईन' लोकलसेवा बंद करण्यात आली होती.
हेही वाचा - दिल्लीच्या मैदानात बसवण्यात येणार अरुण जेटलींचा पुतळा
यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी कोविडमुळे आवश्यक सेवा देणाऱ्या कर्मचार्यांसाठीच चालवल्या जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत वकिलांना परवानगी दिली होती. मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रत्येकाला लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी नव्हती.
मुंबईकरांना दिलासा
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून मुंबईची लोकलसेवा ठप्प आहे. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. तसेच आता महिलांना देखील लोकल प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, सर्वांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. शिवाय दिवाळीत लोकल प्रवासाच्या मागणीने जोर धरला.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई तीव्र -
मुंबईकरांच्या सहकार्यामुळे कोरोना नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. मात्र अजूनही लस आलेली नसल्याने सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करणे आवश्यक झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरल्यास कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे.