मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ३० जानेवारी २०२२ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाउनस, हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या रेल्वेगाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धिम्या डाउन मार्गावर वळवल्या जातील. याशिवाय घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉग कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. याशिवाय पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल कडे जाणा-या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. विशेष म्हणजे नेरुळ- खारकोपर लोकल सेवा रद्द असणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गवर रात्रकालीन मेगाब्लॉक -
पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी रविवारी वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद शनिवारी- रविवारी रात्री ११. ५० ते रात्री २. ५० वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या तीन तासांच्या ब्लॉक कालावधीत वसई रोड ते वैतरणा जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर, काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.