मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आजपासून लॉकडाऊन लागणार आहे. त्यामुळे धारावीमधील जवळपास 30 ते 70 टक्के परप्रांतीय मजूर आपल्या गावी परतले आहेत.
मुंबईमधील धारावी परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर राहतात. हे परप्रांतीय मजूर आता गावी जात आहेत. त्यामुळे धारावीमधील जे लहान-मोठे व्यवसाय आहेत, ते सध्या बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
छत्तीसगड, बंगाल, उत्तरप्रदेश, बिहारमधील मजूर स्थलांतर
धारावीमधील परप्रांतीय मजूर हे प्रामुख्याने छत्तीसगड, बंगाल, उत्तरप्रदेश आणि बिहार या चार राज्यातले असून पाणीपुरी भेळपुरी, उसाचा रस विकणे, मिस्त्री, गवंडी कामगार अशी अनेक कामे हे कारागीर करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळीला ते आपल्या गावी जातात. पण गतवर्षीपासून कोरोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊन करण्यात आले. एसटी आणि रेल्वेसेवाही ठप्प होती. परिणामी सर्व मजूर शहरातच अडकून पडलेले होते. यावेळी लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला व्यवसाय उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि जिल्हा सीमा बंदी होण्याच्या भीतीने परप्रांतीय व्यवसायिक आणि मजूर हे आपापल्या गावाकडे रवाना होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - ...तर राज्याची कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिली असती - नाना पटोले