मुंबई - शहरात 3 ते 5 जानेवारीला होणाऱ्या आयआयटी टेक फेस्टला विज्ञान-तंत्रज्ञान, बॉलिवूड आणि राजकारण क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. उद्या भूतानचे माजी पंतप्रधान दाशो शेरिंग टोबगे, अभिनेत्री विद्या बालन, राजवर्धन राठोड यांचे व्याख्यान होणार असून यासोबतच विविध तंत्रज्ञानाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
टेकफेस्ट म्हणजे विज्ञानाचे आधुनिक जग. बाजारात लेटेस्ट आलेल्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन तसेच अत्याधुनिक यंत्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येतात.
3 जानेवारीला आयआयटीत होणाऱ्या कार्यक्रमात भूतानचे माजी पंतप्रधान दाशो शेरिंग टोबगे हे पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. अभिनेत्री विद्या बालन भारतीय चित्रपटातील महिला सबलीकरणावर बोलणार आहे. तसेच मानव संगणक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकुंतलादेवी या गणितावरील आगामी चित्रपटाच्या अनुभव बद्दल माहिती देणार आहेत.
राजवर्धन सिंग राठोड हे कारगिल युद्धातील कॅप्टन म्हणून काम कसे होते, त्याची आठवण सांगणार आहेत. तसेच ऑलंपिक पदके आणि क्रीडा क्षेत्राच्या वृद्धिसंदर्भात मत प्रदर्शन करणार आहेत.
कॅम्पस स्कूलच्या मैदानावर जगभरातील तंत्रज्ञानाचे सादरीकरण होणार असून यासोबतच आंतरराष्ट्रीय रोबोवार स्पर्धा होणार आहे.