मुंबई - सुजय विखे-पाटील यांनी रेमडेसिवीर आणल्याच्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. आज सुनावणी दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या वकिलांनी "सुजय विखे-पाटील यांनी केवळ औषधाच्या 1700 कुप्या आणल्या. 15 बॉक्स चंदिगढहून विमानाद्वारे आणले. ज्यात 1200 कुप्या होत्या तर अन्य 500 कुप्या या पुण्याच्या सदाशिव पेठेतील वितरकांकडून येथे आणल्या, अशी माहिती दिली.
तसेच त्यापैकी एकही कुपी वेगळी केलेली नाही. हा साठा वैयक्तिक वापरासाठी आणलेला नाही. येथे निर्माण झालेल्या तुटवडा भरून काढण्यासाठी हे केलं. हे कृत्य केवळ लोकहितासाठीच केलं, त्यासाठी त्यांच्यावर फौजदारी कारवाई कशी काय होऊ शकते? सुजय विखे-पाटील यांच्यावतीने कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. त्यावर सुजय विखे-पाटील यांनी विमानातले फोटो दाखवले. विमानतळावर उतरताच व्हिडिओ तयार केला. ज्यात ते लोकांना सांगतायत की, मी माझे संबंध वापरून ही औषधं मिळवली आहेत, याचा अर्थ काय? असा प्रश्न सुजय विखे यांच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाने विचारला.
त्यावर मुंबई उच्च न्यायालयाला सुजय विखे यांनी कधीही आपण 10 हजार रेमडेसिवीर आणली असे म्हटलेले नाही, असा युक्तिवाद केला. जर हा साठा चंदिगढहून या प्रमाणात आला होता तर मग मीडियात जाऊन दिल्लीहून 10 हजार कुप्या आल्याची अधिकाऱ्यांना चुकीची माहिती का दिलीत?', असा थेट सवाल हायकोर्टाने केला.
त्यावर सरकारी वकिलांनी 10 हजारांचा साठा विमानतळावर त्याच दिवशी आला. मात्र अद्याप त्यावर कुणीही दावा केलेला नाही, अशी माहिती कोर्टाला दिली. याचिकाकर्त्यांकडून याप्रकरणी दाखल याचिकेत अशा आणखीन काही घटनांची नोंद घ्यायची असल्याने याचिकेत सुधारणेची संधी देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. कोर्टात पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.