मुंबई - भाजपा नेते हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. रेश्मा खान यांच्या याचिकेवर आज (मंगळवार) सुनावणी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रेश्मा खान यांना तीन आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
भाजपा नेते हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान यांनी बांगलादेशी नागरिक असताना बोगस कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्ट मिळवल्याच आरोप झाल्यानंतर खानच्या विरोधात तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवर अटकपूर्व जामिनासाठी रेश्मा खान यांनी मुंबई सत्र न्यायालयाने देखील धाव घेतली होती. मात्र त्यांना तिथे दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना 3 आठवड्याचे अंतरिम जामीन मंजूर करण्यात आले आहे. तीन आठवड्यापर्यंत कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. रेश्मा खान यांना 25 हजारांच शुएरेटी बाँड जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आरोप काय आहेत?
हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान बांग्लादेशी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नोव्हेंबर महिन्यात केला होता. हे प्रकरण माजी सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने दाबल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुरुळकर यांच्या 16 सप्टेंबर 2020 च्या जबाबाचा दाखला त्यांनी दिला होता. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समक्ष दिलेला पाच पानी जबाब मलिक यांनी उघड केला होता. तत्कालीन सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशाने रेश्मा खान प्रकरणात कारवाई केली नाही. हैदर अली यांच्या पत्नीचा जन्म दाखला हा बनावट असल्याचे पोलिसांच्या जबाबात नमूद असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता.
हेही वाचा - Fake Add of RPF Constable : 'ती' आरपीएफ शिपाई पदासाठीची जाहिरात फेक - नागपूर मंडळ आयुक्त