मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Petition) यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जामिनासाठी धाव घेतली होती. या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली, त्यावेळी न्यायालयाने ईडीला (ED) 8 दिवसात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अर्जावर पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार आहे. अनिल देशमुख यांच्यावतीने इंदरपाल सिंह यांनी युक्तिवाद केला.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर देशमुख यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कसा आहे घटनाक्रम? : ईडीकडून 12 तास चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर 2021 ला अटक केली होती. त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. 29 डिसेंबर रोजी ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. 20 मार्च 2021 ला मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयकडून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते.
ऋषिकेश, सलील देशमुख यांना 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे न्यायालयाचा समन्स : अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख, दुसरा मुलगा सलील देशमुख यांना आज न्यायालयाने 5 एप्रिलपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावला आहे. ईडीने या दोघांना अनेक समन्स बजावूनसुद्धा ते कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचे ईडीने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. त्यानंतर आज सुनावणीवेळी न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा समन्स देण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र : 100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 90 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7 हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे. मात्र, याप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण, याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
नेमकं प्रकरण काय? : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.