मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार ( NCP MP Sharad Pawar) यांच्याविरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या, गुन्हा रद्द करण्यात यावा याकरिता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आता उच्च न्यायालयाने 14 जुलै पर्यंत स्थगिती दिली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. केतकीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आणि तिच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
नेटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले - केतकी चितळेने ही पोस्ट केल्यामुळे पक्षातील नेते कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही पोस्ट करुन, 2 राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले आहे. खासदार शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक मानहानीकारक पोस्ट केतकीने केले असल्याचे नेटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. कळवा पोलिसांनी केतकी विरोधात कलम 505(2), 500,501, 153 A नुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या केतकी चितळे हे जामीनावर बाहेर आहे.
केतकीचे काय आहे म्हणणे - केतकीचे असे म्हणणे आहे, की ज्या व्यक्तीने माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या नावाचा उल्लेख सदरील फेसबुकवरील कवितेत नाही. मी फेसबुकवर पोस्ट केलेली कविता ही पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यक्तीला दुखवणारी ही पोस्ट असली, तरीही कोणत्याही पवार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार दिलेले नाही. मग पोलीस मला अटक कशी काय करु शकतात ? असा प्रश्न केतकीने विचाराला आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून, माझ्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील केतकीने केला आहे.
कोण आहे केतकी चितळे ( Who Is Ketaki Chitale ) - छोट्या पडद्यावरील 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेत केतकीने भूमिका साकारली होती. त्यामुळे महाराष्ट्रतील घराघरा ती पोहचली होती. मात्र, त्यानंतर ती कोणत्याही भूमिकेत अथवा मालिकेत दिसली नाही. पण, केतकी तिच्या भूमिकांमुळे कमी तर वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे. त्याचसोबत, एपिलेप्सी या आजाराने ती ग्रासली असल्याचे तीने सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले होते. तेव्हा ती चर्चेत आली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख - छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारकाबाबत कॉमेडियन अग्रिमा जोशुआने वक्तव्य केले होते. या प्रकणावरुन तिच्यावर टीका करण्यात आली होती. तेव्हा तिने माफी मागितली. परंतु, केतकीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण विसरुन त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद सुरु आहे, असे तिने लिहले होते. त्यामुळे शिवप्रेमींनी केतकीला ट्रोल केले होते.
'तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार' - केतकीने हा जो काही खोडसाळ पणा केला आहे. तिला तिच्याच भाषेत, तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार आहे. पहिली गोष्ट शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याची तिची पात्रता नाही. ती जे काही बोललेही आहे, तिला कोणाताही अर्थ नाही. मात्र, त्यामुळे आमच्या सारख्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याच्याबद्दल तिला चांगल्या चार पाच चापटी मिळाल्या ना, ती तिच्या आजारातून लवकर बरी होईल, असा इशाराही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी दिला आहे.
कळवा, पुण्यात केतकीवर गुन्हा दाखल - केतकी चितळेने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 500, 505(2), 501 आणि 153 A हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पुण्यातही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Petrol Diesel Rates : राज्यात 'या' जिल्ह्यात मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल- डिझेल.. पहा राज्यभरातील आजचे दर