मुंबई - करी रोड परिसरातील अविघ्न पार्क इमारतीला २२ ऑटोबाराला आग लागली होती. या आगीदरम्यान एका व्यक्तीचा उंचावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई अग्निशामक दलाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेचा चौकशी अहवाल आठ दिवसांत पालिका आयुक्तांना सादर केला जाईल, अशी माहिती मुंबई अग्निशामक दलातील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच मुंबईतील उंच इमारतींची पालिका झाडाझडती घेणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
आगीची चौकशी, अहवाल आठ दिवसात
मुंबईत शुक्रवारी २२ ऑक्टोबरला करीरोड येथील ६० मजली वन अविघ्न पार्क या इमारतीमध्ये १९व्या मजल्यावर आग लागली होती. या आगीपासून आपला जीव वाचवण्यासाठी एक व्यक्ती खिडकीमधून बाहेर लटकला होता. त्याचा हात सुटून तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही आग विझवताना स्प्रिंकलमधून पाण्याचा दाब कमी असल्याचे समोर आले आहे. यामुळे आग विझवण्यात अडचणी आल्याचे समोर आले आहे. तसेच या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम केले जात असल्याची तक्रार रहिवाशांनी महापौर आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे.
आठ दिवसांत चौकशी अहवाल
या अनुषंगाने पालिकेने विकासकाविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या आगीच्या ठिकणी पालिका आयुक्तांनी भेट दिली असता चौकशीचे आदेश दिले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, अग्निशामक यंत्रणा कार्यरत होती की नाही आदींची चौकशी केली जात आहे. या घटनेचा चौकशी अहवाल येत्या आठ दिवसांत सादर केला जाणार असल्याची माहिती अग्निशामक दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
बहुमजली इमारतींची घेतली जाणार झाडाझडती
अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी बहुमजली इमारतींची अधूनमधून तपासणी करीत असतात. मात्र सध्याच्या मनुष्य बळानुसार नियमित कामे, दुर्घटना आदी विविध कामे सांभाळून अग्निशामक दलाला इमारतींची तपासणी करावी लागते. यामुळे अग्निशामक दलावरही कामाचा अतिरिक्त ताण वाढतो आहे. मनुष्यबळ कमी असल्याने अशा इमारतींची तपासणी होत नाही. शिवाय अशा इमारतींसाठी सक्षम स्वतंत्र यंत्रणा अद्याप उभारलेली नाही. त्यामुळे अशा घटना घडल्य़ानंतर इमारतींमधील त्रुटी समोर येत आहेत. पालिकेने ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील उंच इमारतींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्रुटी आढळल्यास कारवाई
बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र जानेवारी आणि जूनमध्ये अग्निशामक दलाला सादर करणे सोसायटय़ांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काही सोसायट्या हा नियम धाब्यावर बसवत असल्याचे समोर आले आहे. ‘अविघ्न पार्क’च्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अग्निशामक यंत्रणेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सोसायट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 'महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना कायदा २००६'तील तरतुदींची उत्तुंग इमारतींमध्ये अंमलबजावणी केली जाते आहे की नाही याची पाहणी केली जाणार आहे. यात त्रुटी आढळल्यास संबंधित सोसायटीवर कारवाई केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.