मुंबई - अमली पदार्थ विरोधी घाटकोपर युनिटने गोवंडी परिसरातून 3 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. तस्करांकडून 2 किलो 500 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 75 लाख रुपये असून, आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा - Mumbai Share Market Update :मुंबई शेअर बाजारात दिवसाखेर 1,024 अंशांची पडझड
मुंबई नार्कोटिक्स सेलच्या अधिकाऱ्याला गुप्त माहिती मिळाली होती की, 2 फेब्रुवारी रोजी वसीम खान नावाचा ३३ वर्षीय व्यक्ती गोवंडीतील बेंगनवाडी परिसरात ड्रग्ज विकण्यासाठी येणार आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्यानंतर या प्रकरणात आणखी नावे समोर येत गेली असता 6 फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी सोहिल समीमकडून 1 किलो 200 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. आरोपी जुबेर शेख (वय 41) याला अटक करून त्याच्याकडून सुमारे 200 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.