मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात जल्लोषात जगभर साजरी होते. मुंबईतही जयंती निमित्त मिरवणूका काढल्या जातात. दादर, चैत्यभूमी येथे सकाळपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी असते. आज मात्र याच चैत्यभूमीवर शुकशुकाट आहे. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून कुणालाही आत सोडण्यात येत नसून आतील कुठल्याही व्यक्तीला बाहेर सोडण्यात येत नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा... COVID-19 : गेल्या २४ तासांमध्ये बाराशे रुग्णांची नोंद; देशातील रुग्णांची संख्या दहा हजारांवर..
चैत्यभूमी परिसर ज्या G-दक्षिण विभागात येतो, त्या विभागात कोरोनाग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. आज घरातच जयंती साजरी करण्याचे आवाहन सरकार आणि आंबेडकरी नेत्यांकडुन करण्यात आले आहे. त्याचे पालन भीम अनुयायी करत आहेत. त्यामुळे चैत्यभूमीवर आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बोटावर मोजण्या इतके नागरिक येत आहेत. पोलीस त्यांना समजावून परत पाठवत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकुणच ज्या चैत्यभूमीवर दरवर्षी मोठी गर्दी असते तिथे आज निरव शांतता आहे.