मुंबई - या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. मात्र, निकाल लागून आठवडा झाला तरी सरकार स्थापन होत नाही अशी स्थिती आहे. सत्तास्थापनेत भाजप पक्ष शिवसेनेला महत्व देऊ इच्छित नाही असे चित्र दिसत आहे. मित्रपक्ष असूनही भाजप शिवसेनेचा अपमान करत आहे. शिवसेनेने हा अपमान आजिबात खपवून घेऊ नये, असे मत 'मुंबई डबेवाला असोसिएशन'चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात जर शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली, तर शिवसेनेने ती जरूर घ्यावी आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच करावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन भाजपला धडा शिकवावा. तसेच यापुढे भाजपची चुकूनही मदत घेऊ नये. भाजपला यापुढे मदतही करू नये, असेही सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे.
भाजप सत्तेत आल्यास शिवसेनेला संपवेल..
भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर शिवसेनेनेला संपवण्याचे सर्वेतोपरी प्रयत्न करेल. कारण बाकीचे मित्र पक्ष त्यांनी या निवडणुकीत संपवले आहेतच. आता त्यांचे ध्येय शिवसेना संपवण्याचे आहे. त्याचाच एक प्रयत्न म्हणुन भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेपुढे भाजपचे ४२ बंडखोर उमेदवार उभे केले, आणि शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे काम केले, असे म्हणत तळेकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेने कुणाचीही मदत घेऊन मुख्यमंत्री बनवावा, पण भाजपला संधी देऊ नये..
मागच्या निवडणुकीत शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्याच सत्ता स्थानामुळे ते शिवसेनेला पाणी पाजाण्याच्या गोष्टी करत आहेत. भाजपचा हा भस्मासुर मित्रपक्षांना संपवतो आहे. हा भस्मासुर शिवसेनेच्या डोक्यावरही हात ठेवील, आणि शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करील.
संजय राऊत यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेचे आम्ही स्वागत करतो असे म्हणत, तळेकर यांनी शिवसेनेने आपली ताकत दाखवून देत मुख्यमंत्री आणि सरकार स्थापन करावे, अशी इच्छा डबेवाल्यांतर्फे व्यक्त केली आहे.
हेही वाचा : हीच ती वेळ..! शिवसेनेला छगन भुजबळांनी दिला 'हा' सल्ला