मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. या आरोपांचा तपास सध्या सीबीआय, ईडीकडून सुरू आहे. तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. दरम्यान, देशमुख वारंवार ईडीच्या चौकशीला गैरहजर राहत असल्याने आज(1 ऑक्टोबर) मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
- 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करा -न्यायालय
परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी प्राथमिक चौकशी व आवश्यक असल्यास कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयलासुद्धा दिले होते. आतापर्यत ईडीने पाचवेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख गैरहजर राहिले आहेत. तसेच समन्स बजावण्यात आल्याने देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, न्यायालयानेसुद्धा देशमुखांच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. अद्यापही यावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. मात्र, अनिल देशमुख वारंवार ईडीच्या चौकशीला गैरहजर राहत असल्याने आज मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीने देशमुख तपासात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हेही वाचा - परमबीर सिंग यांचे देशाबाहेर पलायन? लंडनला गेल्याची चर्चा?
- मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना समन्स -
अनिल देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी उच्च न्यायालयाने सीबीआयलासुद्धा चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, सीबीआयसुद्धा या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करत आहे. मात्र, देशमुख प्रकरणात सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले होते. मात्र, या दोघांनीही सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला होता. सीबीआयने कार्यालयात येऊन माहिती घ्यावी असा पवित्रा या दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सीबीआयसुद्धा आता कठोर भूमिका घेण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सीबीआयच्या या भूमिकेमुळे आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासुद्धा अडचणी वाढताना दिसून येत आहेत.
- काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याआधारे सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासान्वये 'ईडी'नेसुद्धा पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत 'ईडी'ने आतापर्यंत पाचवेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी 'ईडी'ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आज मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा - शोधून शोधून दमले, पण परमबीर सिंग सापडेना - जयंत पाटील