मुंबई - आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेली दादर येथील चैत्यभूमी ही ऐतिहासिक वास्तू धोकादायक झाली आहे. त्यासाठी चैत्यभूमीत राहात असलेल्या भंतेजींचे स्थलांतर करण्यात यावे, तसेच धोकादायक वास्तूंची तातडीने दुरुस्ती करा, असे पत्र मुंबई महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांमध्ये चैत्यभूमीची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे भिंती आणि छपराच्या सिमेंटच्या प्लास्टरची पडझड होऊ लागली आहे. ही एक मजली वास्तू समुद्रकिनाऱ्यालगत आहे. खाऱ्या हवेमुळे वास्तूच्या बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळ्या गंजल्या आहेत. परिणामी चैत्यभूमीची दुरुस्ती वा पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने राज्य सरकारला पत्र पाठवल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पुरातन वारसा वास्तू श्रेणी ‘अ’ आणि पर्यटनस्थळ ‘अ’ श्रेणीमध्ये चैत्यभूमीचा समावेश आहे. त्यामुळे ही वास्तू जतन करणे आवश्यक आहे. ही वास्तू भारतीय बौद्ध महासभेच्या अखत्यारित असून वास्तूचा प्रत्यक्ष ताबा डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याकडे आहे. चैत्यभूमीच्या पुनर्बांधणीबाबत भीमराव आंबेडकर आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये ५ ऑक्टोबर २०१९ रोजी चर्चा झाली होती. या वास्तूचे संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे, असे त्यांना कळविण्यात आले असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
चैत्यभूमीच्या पुनर्बांधणीसाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आल्याचे पालिकेला २१ नोव्हेंबर २०१९ रोजी पत्र पाठवून कळविण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात कोणतीही कार्यवाही सुरू असल्याचे निदर्शनास आले नाही. गेल्या काही दिवसांमध्ये चैत्यभूमीतील भिंती आणि छपराच्या गिलाव्याचा काही भाग अधूनमधून कोसळत आहे, तर वास्तूला मुख्य आधार असलेल्या खांबांना भेगा पडत आहेत. परिणामी ही वास्तू धोकादायक बनू लागली आहे. तेथे वास्तव्यास असलेल्या भंतेजींना स्थलांतरित होण्याची सूचना पालिकेकडून करण्यात आली आहे. याबाबत भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना पालिकेकडून वारंवार वास्तूच्या स्थितीबाबत माहिती देण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.