मुंबई - शहरातील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता ३६ दिवसांवर पोहोचला असून वरळी, धारावी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यासारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. रुग्णालयातील बेड, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, कोरोना उपचार केंद्र या सर्व सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, नागरिक यांचे सहकार्य लाभत आहे. याच वेगाने आपण सर्व मिळून कोरोना विरुद्ध लढत राहिलो, तर जुलै मध्यापर्यंत कोविड संसर्गाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली असेल असा विश्वास महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.
मुंबईमधील पालिकेच्या बहुसंख्य विभागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली, तरी काही विभागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असल्याचे लक्षात घेऊन त्या विभागांमध्ये मिशन झिरो राबवले जात आहे. या उपक्रमाचा आरंभ अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातून आयुक्त चहल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात ५० फिरते दवाखाने (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करुन बाधितांचा शोध घेणार आहेत. २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये हा उपक्रम चालणार आहे.
यावेळी बोलताना, महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी शासनामध्ये कोरोना अनुषंगाने संपूर्ण राज्याची माहिती संकलित करण्याचे व संनियंत्रण करण्याचे कामकाज हाताळत असल्याने मुंबईच्या स्थितीची नेमकी कल्पना होती. महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर टेस्टिंग, ट्रॅकिंग, क्वारंटाईन आणि ट्रीटमेंट या सूत्राचा अवलंब करून काम सुरू केले. सर्वप्रथम वैद्यकीय प्रयोगशाळांना २४ तासांच्या आत कोरोना रुग्णांचा अहवाल देणे बंधनकारक केले. त्यानंतर कोरोना उपचार केंद्र व रुग्णालये यांची क्षमता वाढ करण्यावर भर दिला. मे महिन्यातील ३,७०० खाटांच्या तुलनेत आज रुग्णालयांमध्ये १२ हजार खाटा उपलब्ध आहेत. जूनअखेरपर्यंत १५ हजार तर जुलै अखेरपर्यंत २० हजार खाटा उपलब्ध असतील, असे आयुक्तांनी सांगितले.
खाटांची संख्या वाढवताना डॉक्टर्सची संख्याही वाढवली. निवासी वैद्यकीय अधिकाऱयांच्या मानधनात पाचपट वाढ करतानाच महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये संसर्ग कमी आहे, अशा भागातून डॉक्टरांना मुंबईत आणले. त्यासाठी राज्य सरकारने मोलाचे सहकार्य केले. मे महिन्यातील १०० च्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या आता ७०० पर्यंत पोहोचली आहे. वरळी, धारावी त्याचप्रमाणे देवनार, गोवंडी, बैंगनवाडी या सर्व आव्हानात्मक भागांमध्ये फिरते दवाखाने व वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक बाधित शोधून काढले आणि संपर्कातील व्यक्तींना अलगीकरण केले. यातून विषाणूची साखळी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत झाली. आतापर्यंत मुंबईतील सुमारे ९४ लाख लोकांचे सर्वेक्षण केले. ५ लाख ज्येष्ठ नागरिकांची प्राथमिक तपासणी केली. अशा व्यापक प्रयत्नांमुळे मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता ३६ दिवसांपर्यंत पोहोचला आहे, असे आयुक्त म्हणाले.
अनलॉकडाऊन केल्यावर संसर्ग वाढण्याची भीती होती. मात्र सुदैवाने ३ जून ते २२ जून २०२० म्हणजे मागील १९ दिवसात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणातच आहे. एका बाजूला मुंबईतील स्थिती नियंत्रणात येत असताना विशिष्ट ६ ते ७ विभागांमधून अद्यापही मुंबईच्या एकूण रुग्णसंख्येच्या निम्मे रुग्ण आढळत आहेत. ही बाब लक्षात घेता आम्ही या भागांमध्येही आक्रमक पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी फिरते दवाखाने अर्थात मोबाईल डिस्पेंसरी व्हॅनच्या माध्यमातून या विभागांच्या सर्व परिसरांमध्ये पोहोचून तपासणी वाढवण्यात येईल. संशयित रुग्णांची जागेवरच चाचणी केली जाईल. यातून बाधितांचा वेळीच शोध घेऊन त्यांना वेगळे केल्यास विषाणूची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये लोकप्रतिनिधी, विविध सेवाभावी आणि समाजसेवी संस्था, नागरिक व प्रसारमाध्यमांचे देखील सहकार्य आत्तापर्यंत लाभले आहे आणि यापुढेही अपेक्षित आहे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
डायलिसिस रुग्णांचा महिनाभरात मृत्यू नाही
मुंबई महानगरामध्ये मागील एका महिन्यात डायलिसिस आवश्यक असलेल्या कोरोनाबाधित एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे उदाहरण जगात अन्यत्र कुठेही नाही, असे आयुक्त म्हणाले. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भव्य कोरोना उपचार केंद्र अर्थात जम्बो फॅसिलिटी सुरू केल्याने फिल्ड हॉस्पिटलची मोठी साखळी तयार झाली आहे. त्यामुळे नियमित रुग्णालयांना कोरोना प्रमाणेच इतर आजाराच्या रुग्णांना देखील खाटा उपलब्ध करून उपचार करणे शक्य होत आहे. महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये वॉर्ड वॉर रुम तयार केल्याने आता महानगरपालिका स्वतः पॉझिटिव्ह रुग्णांपर्यंत पोहोचते, त्यांच्याशी संपर्क आणि सुसंवाद साधून सर्व समस्यांचे निराकरण करते. त्यातून योग्यरित्या बेड मॅनेजमेंट होत आहे. या सर्व प्रयत्नांचा परिपाक म्हणून आज रुग्णालयांमधील सुमारे अडीच हजार कोविड बेड रिकामे आहेत. तर १,३०० आयसीयू रुग्णशय्यांपैकी ७१ रिकामे आहेत. याच पद्धतीने कामगिरी होत राहिली तर जुलैमध्यापर्यंत मुंबईतील कोविड संसर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणात असेल. त्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांना सर्व संस्थांचे, प्रसारमाध्यमांचे आणि जनतेचे सहकार्य व सहभाग आवश्यक आहे, असे आवाहनही महापालिका आयुक्त चहल यांनी केले आहे.