मुंबई - डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १०८ रुग्ण आढळून आले होते, त्यात वाढ होऊन रविवारी ( दि. २ जानेवारी) ८ हजार ६३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नसल्याने रुग्णालयातील ९० टक्के बेड रिक्त आहेत. मुंबईत एका ओमायक्रॉनच्या रुग्णाचीही वाढ झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकर व आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. ( Mumbai Corona Update on 2nd jan 2022 )
२९ हजार ८१९ सक्रिय रुग्ण -
मुंबईत रविवार ( दि. २ जानेवारी ) ८ हजार ६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ९९ हजार ५२० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५० हजार ७३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २९ हजार ८१९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients of Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १८३ दिवस इतका आहे. मुंबईमधील २०३ इमारती आणि ९ झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. २६ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.३८ टक्के इतका आहे.
९० टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ८ हजार ६३ रुग्णांपैकी ७ हजार १७६ म्हणजेच ८९ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. आज ५०३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ५६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३० हजार ५६५ बेड्स असून त्यापैकी ३ हजार ५९ बेडवर म्हणजेच १० टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९० टक्के बेड रिक्त आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारीला ६३४७, २ जानेवारीला ८०६३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
या आठ दिवशी शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.
धारावीत ६० रुग्णांची नोंद -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने गेल्यावर्षी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ८ एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. कित्तेकवेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहे. गेल्या २४ तासात धारावीत ६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी १८ मे रोजी सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. आज (दि. 2 जानेवारी) ६० नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ३५७ इतकी झाली आहे. आतापर्यंत ६ हजार ७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या १७९ सक्रिय रुग्ण आहेत.