मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रसार मुंबईत मार्चपासून सुरू झाला. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ७ डिसेंबरपर्यंत १ हजार ३२९ कोटी ४१ लाख रुपये खर्च केले आहेत. येत्या मार्चपर्यंत कोरोनावर खर्च करता यावा, म्हणून पालिकेच्या अर्थसंकल्पातून आणखी ४०० कोटी रुपये आकस्मिक निधीत वळवण्यात आले आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार -
मुंबईत मार्च महिन्यात कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला. मार्चमध्ये रुग्ण वाढत असतानाचा देशभरात २३ मार्चला लॉकडाउन लावण्यात आला. लॉकडाउनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प झाले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला. रुग्णालये कमी पडू लागल्याने विभागात शाळा, सभागृह ताब्यात घेऊन क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आली, जंबो कोव्हिड सेंटर उभारण्यात आली. रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून इंजेक्शनची खरेदी करण्यात आली. या सर्वांसाठी लागणारा खर्च तातडीने करता यावा म्हणून स्थायी समितीला असलेले अधिकार पालिका आयुक्तांनी आपल्याकडे घेतले.
तरतूद आणि खर्च -
पालिकेच्या अर्थसंकल्पात आकस्मिक निधीची केलेली तरतूद खूपच अपुरी होती. १ एप्रिल २०२० पर्यंत पालिकेकडे आकस्मिक निधीत ८५२.५७ कोटी रुपयांची शिल्लक होती. त्यात शासनाकडून पालिकेला कोरोनासाठी ६० कोटींचा निधी उपलब्ध झाला. पालिकेने आणखीन ३०० कोटींची भर घालून एकूण ३६० कोटी रुपयांचा निधी आकस्मिक निधीत वळता केला. आकस्मिक निधी म्हणून जमा असलेल्या १२१२.५७ कोटी रुपये निधीतून १३ ऑक्टोबर २०२० पर्यंत महसुली व भांडवली खर्च भागविण्यासाठी ११८२.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे आकस्मिक निधीत ३०.३२ कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहिला होता.
आणखी ४०० कोटींची तरतूद -
पालिकेने कोरोनाकाळात निधीची कमतरता भासू नये यासाठी अर्थसंकल्पातील शिल्लक १६४४.४२ कोटी रुपयांमधून ४५० कोटी रुपये आकस्मिक निधीत वळवला आहे. या आधीही अर्थसंकल्पीय तरतुदींमधून ३०० कोटी रुपये आकस्मिक निधीत वळवण्यात आले होते. मात्र हा निधी त्यावेळी खर्च झाल्याने आणखी ४०० कोटींची तरतूद करावी असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत सादर केला आहे.
हेही वाचा - इम्रान ताहिरची बिग बॅश लीगमधून माघार